Vande Bharat Train : मुंबई ते शिर्डी वंदे भारत ट्रेनने प्रवास करुन मुख्यमंत्र्यांना कसं वाटलं? देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की…

Vande Bharat Train : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वत: वंदे भारत ट्रेनने प्रवास केला. ते मुंबईवरुन ट्रेनने शिर्डीला आले. त्यांनी इतरांसमोर आपल्या कृतीतून उदहारण ठेवलं. आपल्या या ट्रेन प्रवासाच्या अनुभवाबद्दल त्यांनी मीडियाशी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Vande Bharat Train : मुंबई ते शिर्डी वंदे भारत ट्रेनने प्रवास करुन मुख्यमंत्र्यांना कसं वाटलं? देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की...
CM Devendra Fadnavis
| Updated on: May 23, 2026 | 12:00 PM

“वंदे भारत ट्रेन ही नवं भारताची एक अनुपम भेट माननीय मोदीजींनी दिली आहे. जगातल्या विकसित राष्ट्रांमध्ये जशा ट्रेन आहेत, तशा प्रकारची ही वंदे भारत ट्रेन आहे. आज मी याच ट्रेनने मुंबईवरुन साईनगर शिर्डीला आलो. अतिशय उत्तम प्रवास झाला. खूप चांगला अनुभव होता. अनेक लोकांच्या भेटी झाल्या. रस्त्यात फाईल्सची कामं करता आली. मला आजचा प्रवास लाभदायी वाटला” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेलची बचत करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार, आज मुख्यमंत्र्यांनी मुंबई ते शिर्डी प्रवास कारऐवजी ट्रेनने केला.

“जेवढं अनुकरण करता येईल तेवढं प्रत्येकाने केलं पाहिजे. माझा प्रयत्न जिथे-जिथे शक्य आहे, तिथे-तिथे त्या-त्या ठिकाणी पंतप्रधानांनी जे काय आवाहन केलय, त्या आवाहनानुसार काम करावं. आपण केलं तर लोकांना देखील इच्छा निर्माण होते, तो माझा प्रयत्न आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

शांतता तेच प्रस्थापित करु शकतात

साईबाबांच्या शिर्डीबद्दलही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “खूप आनंदाची गोष्ट आहे. भक्ती आणि शक्ती भारतीय अध्यात्मात एकत्र आहे. आपण सगळे भक्ती आणि शक्तीचे उपासक आहोत. त्यामुळे शांतता तेच प्रस्थापित करु शकतात, जे शक्तीमान असतात. दुर्बल व्यक्ती कधी शांतता प्रस्थापित करु शकत नाही. आपण शक्तीमान असलो तर जगाला साईंचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश शिकवू शकतो” असं मुख्यमंत्री म्हणाले.

अनुकरण करुन इतरांसमोर उदहारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारने अनेक मंत्र्यांच्या वाहन ताफ्यात कपात केली आहे. जेणेकरुन पेट्रोल-डिझेलची बचत होईल. मुख्यमंत्री स्वत: अनुकरण करुन इतरांसमोर उदहारण प्रस्थापित करत आहेत. त्या दिवशी सुद्धा मुख्यमंत्री मोटर सायकल वरुन विधान भवनात आले होते. आजही मुख्यमंत्र्यांनी मुंबई ते शिर्डी वंदे भारत ट्रेनने प्रवास करुन पेट्रोल-डिझेलची बचत केली. मोदींनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.

Follow Us