
“मी जगभरातल्या गणेशभक्तांना गणेशपर्वाच्या खूप-खूप शुभेच्छा देतो. हा गणेशोत्सव सर्वांना सुख, समाधान देणारा आरोग्यदायी ठरो. श्री गणेशाचा आशिर्वाद सर्वांना प्राप्त होवो” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “आपल्या सगळ्यांना माहित आहे, श्री गणेश आराध्य दैवत आहेत, विघ्नहर्ता आहेत, आपल्या देशावर-राज्यावर येणारी विघ्न हरोत, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण करण्यासाठी आम्हाला आशिर्वाद देवोत, अशी विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना करतो” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
यंदा गणेशोत्सवात गर्दी दिसतेय. त्यावरही मुख्यमंत्री बोलले. “गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. नियोजनासंदर्भात त्या-त्या ठिकाणची पोलीस युनिट्स आहेत. मंडळांसोबत SOP पाळण्याविषयी चर्चा केली आहे. मोठ्या मंडळांसोबत रिहर्सल केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणता लोक येतात, त्याचा विचार करता, मोठ्याप्रमाणात काळजी घेतली आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ट्रम्प यांच्या टॅरिफवर काय म्हणाले?
“आपल्या पंतप्रधानांनी जे अपील केलय, त्यानुसार गणेशोत्सवात ऑपरेशन सिंदूर पहायला मिळतय. आत्मनिर्भर भारत, स्वदेशीचा बोलबोला आहे. पंतप्रधानांनी जे देशाला आवाहन केलय, त्याला लोकांनी जन आंदोलन म्हणून स्वीकारलय” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या 50 टक्के टॅरिफवर सुद्धा मुख्यमंत्री बोलले. “जेव्हा एक मार्ग बंद होतो, तेव्हा दुसरे मार्ग खुले होतात. आमची परिस्थितीवर बारीक नजर आहे. अनेक मार्ग उघडतील. आपण या आव्हानाला संधीमध्ये बदलू” असं फडणवीस यांनी सांगितलं.
राज-उद्धव गणपतीत एकत्र आले, त्यावर काय प्रतिक्रिया?
गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येताना दिसले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “गणेशाने सुबुद्धी दिली म्हणून दोन भाऊ एकत्र आले. अशीच सुबुद्धी त्यांना मिळत राहो”
टॅरिफच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची वॉर रुम
अमेरिकन टॅरिफच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात वॉर रुम उघडली आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, “आम्ही असं ठरवलय की, वेगवेगळ्या बाजारपेठेत व्यापार वाढवण्याकरिता, जागतिक स्पर्धेकरिता सुधारणा करण्यासाठी वॉररुम उघडली आहे” “शंभर सुधारणा करण्याच टार्गेट ठेवलं आहे. आपला उत्पादन खर्च कमी कसा होईल, नवीन बाजारपेठा मिळाल्या पाहिजेत. राज्य सरकार म्हणून जे करता येईल, ते करु” असं फडणवीस म्हणाले.