
मुंबई | 27 जुलै 2023 : राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळून (heavy rain) असून पावसाचा जोर वाढतानाच दिसत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, रत्नागिरी यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने झोडपलं आहे.
पण सतत कोसळणाऱ्या या पावसाचा फायदाही झाला असून राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही (dam water level) वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील अनेक धरणे ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत आहे. १४ जुलै रोजी राज्यातील धरणात सरासरी ३० टक्के पाणीसाठा होता पण आता सतत पडणाऱ्या पावसामुळे ११ दिवसांत धरणातील सरासरी पाणीसाठ्यात तब्बल १५ टक्के वाढ झाली आहे.
राज्यातील धरणांची स्थिती काय ?
पण गेल्यावर्षीच्या तुलनेत राज्यातील मोठ्या, मध्यम, लघू धरणांमध्ये २२ टक्के पाणीसाठा कमी आहे. पुणे विभागातील धरणांत सध्या ४२ टक्के पाणीसाठा असून औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी, म्हणजे २७ टक्केच पाणीसाठा आहे. तर अमरावती विभागात ६० टक्के, नागपूर विभागात ५८ टक्के जलसाठा , नाशिक विभागातील धरणांमध्ये ३८ टक्के जलसाठा आणि कोकण विभागातील धरणांमध्ये सर्वात जास्त, म्हणजे ७३ टक्के पाणीसाठा आहे.
सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कन्हेर धरणाच्या पाणी पातळीतही वाढ होताना पाहायला मिळत आहे. सातारा शहरानजीक असणाऱ्या कन्हेर धरणाच्या पाणी पातळीतही वाढ होताना पाहायला मिळत आहे सध्या हे धरण 57 टक्के भरले असून जिल्हा प्रशासन सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज झाले आहे.
शहापूर तालुक्यातील जांभे धरण ओव्हरफ्लो
शहापूर तालुक्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत असणारे जांभे धरण ओव्हरफ्लो झाले असून अनेक पर्यटक पाण्याचा आनंद लुटण्यासाठी येता. मात्र
या ठिकाणी पर्यटनासाठी जिल्हा प्रशासनाकडून मनाई हुकूम लागू करण्यात आल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. तर मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारे
शहापूर तालुक्यातील तानसा धरण तुडुंब भरून ओसंडून वाहू लागले. धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून 1100 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर आता धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले असून 7700 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे तानसा धरणाखालील व नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
भंडारदरा धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम
भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला रंधा धबधबा सुरू झाला आहे. भंडारदरा धरणातील पाणीसाठा नियंत्रीत करण्यासाठी प्रवरा नदीत ६ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याने रंधा धबधब्याने रौद्र रूप धारण केलं आहे.
अकोला जिल्हातल्या मुर्तीजापुर तालुक्यातील उमा नदीवरील खांदला धरण पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोल्हापुरातील राधानगरी धरण 100% भरलं असून धरणाच्या सहा नंबरच्या स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली
दरम्यान मोरबे डॅममध्ये अधिकचा पाणी साठा तयार झाल्याने नवी मुंबईकरांची पाण्याची चिंताही मिटली आहे. मोरबे धरणात 30 दिवसात 2082 मिलिमिटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.