Marathi News Maharashtra Maharashtra Election 2024 A Battle between Shiv Sena Uddhav thackeray vs eknath shinde
शिवसेना VS शिवसेना, कोणकोणत्या मतदारसंघांत शिंदे-ठाकरेंचे उमेदवार समोरासमोर? लढाई तीव्र होणार
शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेत शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना आमनेसामने येणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातील 27 जागांवर दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात मैदानात असतील.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांमध्ये प्रचंड घडामोडी घडल्यानंतर आता अखेर विधानसभा निवडणूक पार पडत आहे. या विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार? ते पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राने फोडाफोडीचे राजकारण पाहिलं. राज्यातील दोन मोठ्या पक्षांमध्ये मोठी फूट पडली आणि दोन पक्षांचे रुपांतर थेट 4 पक्षांमध्ये झालं. शिवसेनेचा एक गट सत्तेत आहे तर दुसरा गट विरोधात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील एक गट सत्तेत आहे तर दुसरी गट विरोधात आहे. केवळ भाजप आणि काँग्रेस पक्षच राज्यात सध्याच्या घडीला एकसंघ आहे. असं असलं तरी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची या राजकारणात सर्वाधिक हानी झाली आहे. कारण शिवसेनेचे फक्त आमदार फुटले नाहीत तर स्थानिक पातळीवरची बरीच संघटना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभी राहिली आहे. या सगळ्या घडामोडींनंतर आता आणखी मोठ्या परिक्षेचा काळ आलेला आहे. कारण विधानसभा निवडणुका आहेत. पक्षफुटीवर सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं? हे मतदानातून स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही गटांकडून आपापल्या उमेदवारांच्या प्रत्येकी 2 याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या याद्यांनुसार, आतापर्यंत 27 जागांवर दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत.
शिवसेना VS शिवसेना, कोणकोणत्या जागांवर?
कोपरी पाचपाखडीमध्ये एकनाथ शिंदेंविरोधात ठाकरे गटाचे केदार दिघे निवडणुकीच्या रिंगणात असतील. तर माहिममधून शिंदे गटाच्या सदा सरवणकरांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंतांना उमेदवारी देण्यात
आली आहे.
ओवळा मजिवाडामधून शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रताप सरनाईक तर ठाकरेंच्या शिवसनेकडून नरेश मणेरा मैदानात आहेत.
जोगेश्वरी पूर्वमधून शिंदेंच्या शिवसेनेनं रवींद्र वायकरांच्या पत्नी मनिषा वायकरांना उमेदवारी दिलीय. दरम्यान त्यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनंत बाळा नर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कुर्ला मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून मंगेश कुडाळकर, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रविणा मोरजकर या मैदानात असतील.
राजापूरमधून शिंदे गटाच्या किरण सामंतांविरोधात ठाकरे गटाच्या राजन साळवींचं आव्हान असणार आहे.
सावंतवाडीमधून दीपक केसरकरांना ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन तेली आव्हान देणार आहेत.
रत्नागिरीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार उदय सामंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे बाळा माने हे मैदानात असतील.
महाडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून भरत गोगावले मैदानात आहेत. तर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांना उमेदवारी देण्यात आली आहे.