
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे राज्यातील बहुतांशी भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात पोहोचले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांसोबतही चर्चा केली. यावेळी काही शेतकऱ्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकरी कर्जमाफी करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
लातूरमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. बीड, लातूर आणि धाराशिवमध्ये ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. नद्यांना पूर आल्याने त्याचे पाणी आसपासच्या शेतीमध्ये शिरले आहे, त्यामुळे पिकांचे नुकसान झालं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे धान्याचेही नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी मी आज आलो आहे. शासन म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो की, सर्व निकष बाजूला ठेऊन आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत.’
मुख्यमंत्री बोलत असताना शेतकऱ्यांनी ओल्या दुष्काळाची आणि कर्जमाफीची मागणी केली. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, टंचाई म्हणजे दुष्काळ. टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना केल्या जातात, तशाप्रकारच्या सगळ्या उपाययोजना आम्ही लागू करणार आहोत. सर्वांना मदत दिली जाणार आहे. ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे, ज्यांच्या दुकानाचं नुकसान झालं आहे त्यांनाही मदत केली जाणार आहे. आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. याबाबत प्रश्न विचारला असला उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘आम्ही पण विरोधी पक्षात होतो. विरोधक अशा मागण्या करतात. पण सत्तेत असताना तुम्हाला अशा घटनांमुधून मार्ग काढावे लागतात. आज राज्य सरकारचे जे नियम आहेत, ते नियम बाजूला ठेवण्याची आमची तयारी आहे. शेतकऱ्यांची मदत करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही काय-काय करता येईल यात आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत, असे सांगत अजित पवार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची शक्यता फेटाळून लावली.