
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरु असलेल्या अतिवृष्टीने विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे अक्षरशः होत्याचे नव्हते केले आहे. ज्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पूर आणि सततच्या पावसामुळे अनेक नद्यांना महापूर आला आहे. प्रशासनाने दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतरही अनेक गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. परिणामी, शहरी आणि ग्रामीण भागातील दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले असून अनेक मुख्य मार्ग बंद झाले आहेत. एका बाजूला कर्ज काढून उभे केलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहे. तर दुसरीकडे नागरिकांची सुरक्षितता आणि स्थलांतरण असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीने खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. चाळीसगाव तालुक्यात एकाच दिवसात १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ज्यामुळे तालुक्यातील सातही मंडळांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. हादगाव शिवारातील शेतकऱ्यांचे हात तोंडाशी आलेले कपाशी पीक अक्षरशः शेतातच सडून गेले आहे. एका शेतकऱ्याने पाच एकरसाठी पाच लाख रुपये खर्च केला. पण आता उत्पन्न एक रुपयाही निघणार नसल्याची व्यथा मांडली. सरकारने दिवाळीपूर्वी मदत न केल्यास दिवाळी अंधारात जाईल, असा आक्रोश शेतकऱ्यांनी केला आहे.
याचबरोबर, भडगाव आणि नाशिकमधील पावसामुळे गिरणा नदीला आलेल्या पुराचे पाणी एरंडोल तालुक्यातील उतरान गावात शिरले आहे. गेल्या २० वर्षांत प्रथमच एवढा मोठा पूर आल्याचे ग्रामस्थ आणि दुकानदारांचे म्हणणे आहे. तसेच, अंजनी नदीला आलेल्या पुरामुळे एरंडोल-येवला हायवेवरील वाहतूक बंद करण्यात आली असून, कासोदा, खडकेसह अनेक गावांचा एरंडोल शहराशी संपर्क तुटला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. सिना कोळेगाव, खासापुरी आणि चांदणी या धरणांतून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने दुधना, चांदणी आणि सिना नद्यांना महापूर आला आहे. सिना धरणातून सध्या १ लाख ४ हजार १० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे परंडा तालुक्यातील परंडा-करमाळा, परंडा-बार्शी यांसारखे शहराला जोडणारे सर्व मुख्य मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे ठप्प झाले आहेत. आवार पिंपरी, सोनगिरी, सरणवडी येथील पुलांवरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
एकीकडे अतिवृष्टीचा फटका असतानाच, जळगाव खानदेशातील केळी उत्पादक भावातील घसरणीने हवालदिल झाले आहेत. सणासुदीच्या काळात केळीचा भाव ३,००० रुपयांवरून थेट ३०० रुपये क्विंटलवर आल्याने लागलेला खर्चही निघत नाही. मजुरी ५०० रुपये असताना ३०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठी निराशा व्यक्त केली आहे. त्यातच, पीक विम्याचा मोबदला आणि नुकसानीचे पंचनामे होऊनही मदत मिळत नसल्याने केळी उत्पादक प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत.