
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे अतिवृष्टी झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जळगाव, जालना, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतातील पिके वाहून गेली आहेत. तसेच शहरांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पावसाने कहर केला असून, सुमारे ७ हजार हेक्टरपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे केळी, कापूस, सोयाबीन आणि मका यांसारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात सरासरी ६७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे ३५ गावे बाधित झाली आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांना या नुकसानीची माहिती दिली असून, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जालना जिल्ह्यातही दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ९४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. यामध्ये कपाशी, सोयाबीन आणि तूर यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने हा प्राथमिक अहवाल दिला आहे. शहरातही अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरले होते. तसेच ग्रामीण भागात वीज पडून पाच जनावरे दगावली आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातही पावसाने हाहाकार माजवला आहे. बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर आला आहे, ज्यामुळे मांडेगाव, कांदलगाव, देवगावसह ८ गावातील हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. तर, दक्षिण सोलापूर तालुक्यातही झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दैना झाली आहे. येथील शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे.
हातातोंडाशी आलेले खरीप पीक पूर्णतः पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे उडीद, तूर, सोयाबीन आणि मूग ही पिके गुडघाभर पाण्यात असल्याने सडू लागली आहेत. मंद्रूप, निंबर्गी, कंदलगाव, तिऱ्हे, पाथरी, पा कणी आणि तेरामैल परिसरातील शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
नाशिकमध्ये अवघ्या काही मिनिटांच्या पावसामुळे स्मार्ट सिटीच्या कामाचा फज्जा उडाला. वाघाडी नाल्यातून आलेल्या पाण्यामुळे बुधवारच्या बाजारात दुकाने लावलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अनेक शेतकऱ्यांचे साहित्य वाहून गेले. आजही अनेक शेतकरी आपले साहित्य शोधत आहेत. या घटनेमुळे स्मार्ट सिटीच्या कामाची गुणवत्ता समोर आली आहे.