
महाराष्ट्रात सध्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे.राज्याच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अकोला, परभणी, नांदेड, लातूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. ज्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे, तर काही घटनांमध्ये सुदैवाने बचावकार्य यशस्वी झाल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कंझारा नदीला पूर आला आहे. शेतातून घरी परत येत असताना दोघी मायलेकी पुरात वाहून गेल्या. सुदैवाने 18 वर्षीय मुलगी बचावली. पण तिची आई अद्यापही बेपत्ता आहे. तिचा शोध घेण्यासाठी कुरणखेड येथील वंदे मातरम बचाव पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. येत्या 30 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पुराच्या पाण्यात जाण्याचे धाडस करू नये. पूर आलेल्या रस्त्यांवरून गाडी चालवू नये, झाडाखाली आश्रय घेऊ नये असे आवाहन केले आहे.
परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात धोंड नदीला पूर आल्याने एक 24 वर्षीय युवक वाहून गेला. भागवत कदम असे या युवकाचे नाव आहे. तो पुलावरून जात असताना अचानक वाहून गेला. सुदैवाने तो बाभळीच्या झाडात अडकल्यामुळे त्याचे प्राण वाचले. या घटनेनंतर नदी आणि ओढ्यांवरून प्रवास करताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात बेल्लोरी पुलावर ऑटोसह एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला. ऑटोमध्ये असलेले इतर दोन तरुण सुदैवाने बचावले. लक्ष्मण रानमले असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. तर अंधार झाल्यामुळे प्रशासनाने शोध मोहीम थांबवली आहे. लातूर जिल्ह्यातील माकणी ते शिरूर ताजबंद रस्त्यावरील एका ओढ्याच्या पुरात एक शेतकरी वाहून गेला. शेतातून परत येत असताना तो अडकला. सुदैवाने तो एका झाडाला अडकलेल्या अवस्थेत आढळला. गावकऱ्यांनी त्याला वाचवले. दैव बलवत्तर म्हणून हा शेतकरी बचावला आहे.
बीड जिल्ह्यात जोरदार पावसामुळे धारूर तालुक्यातील वाण नदीला पूर आला. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने नितीन शिवाजीराव कांबळे हे त्यांच्या चारचाकी वाहनासह पुरात वाहून गेले. पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यांचा शोध लागला नाही. आज सकाळी त्यांचा मृतदेह वाहून गेलेल्या ठिकाणापासून 100 मीटरवर असलेल्या बंधाऱ्याजवळ अडकलेल्या अवस्थेत सापडला. पोलीस, महसूल आणि गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील विविध भागांत पूरस्थितीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.