Tukaram Mundhe: एफडीए म्हणजे पनिशमेंट पोस्टिंग..; FSSAI चे सीईओ तुकाराम मुंढेंबद्दल काय म्हणाले?
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांच्या कडक कारवाईमुळे ते आधीपासूनच चर्चेत आहेत. अन्नातील भेसळ, स्वच्छतेचे नियम आणि खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत त्यांचा विभाग सक्रियपणे कारवाई करत आहे.

महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे सध्या त्यांच्या कडक आणि धडाकेबाज कारवाईमुळे चर्चेत आहेत. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेपासून स्वच्छतेपर्यंत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर त्यांनी कठोर कारवाई केली आहे. आता त्यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक थेट भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे (FSSAI) CEO रजित पुन्हानी यांनी केलं आहे. मुंढेंच्या कामाचं उदाहरण देत त्यांनी अन्न सुरक्षा विभागातील पोस्टिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज व्यक्त केली.
FSSAI CEO रजित पुन्हानी यांनी एका मुलाखतीत अन्न सुरक्षा विभागात काम करण्याबाबत असलेल्या जुन्या मानसिकतेवर भाष्य केलं. अनेकदा या विभागातील नियुक्तीकडे ‘पनिशमेंट पोस्टिंग’ (शिक्षेची पोस्टिंग) म्हणून पाहिलं जात होतं. अधिकारी या जबाबदारीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असत. मात्र, आता ही मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं पुन्हानी यांनी सांगितलं. त्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाचं उदाहरण देत सांगितलं की, उपलब्ध मनुष्यबळाच्या मदतीनेही मोठ्या प्रमाणावर अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करता येते. मुंढेंनी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करता आपल्या आहे त्या टीमसोबत हजारो तपासण्या केल्या आहेत. त्यामुळे इच्छाशक्ती असेल तर उपलब्ध संसाधनांमधूनही प्रभावी काम करता येतं, असा संदेश त्यांच्या कार्यपद्धतीतून मिळतो, असं पुन्हानी यांनी नमूद केलं.
तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्र FDA आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवर विशेष भर दिला आहे. रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ विक्री केंद्र, गोदामं आणि इतर आस्थापनांची तपासणी वाढवण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर परवाने निलंबित करण्यापासून इतर कारवाईपर्यंत पावलं उचलण्यात आली आहेत. याच काळात त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर तपासण्या झाल्या असून शेकडो आस्थापनांवर कारवाई करण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा विभागाच्या कामाकडे नागरिकांचंही लक्ष वेधलं गेलं आहे.
रजित पुन्हानी यांनी अन्न सुरक्षा विभागाला अधिक महत्त्व देण्याची गरज असल्याचंही स्पष्ट केलं. आरोग्य व्यवस्थेला देशात दीर्घकाळापासून महत्त्व दिलं जात असलं तरी अन्न सुरक्षा ही तुलनेने नवीन व्यवस्था असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक राज्यात स्वतंत्र आणि सक्षम अन्न सुरक्षा आयुक्त असणं गरजेचं असल्याचंही त्यांचं मत आहे.