तर आम्ही आमच्या तलवारी बाहेर काढू, हिंदी सक्तीविरोधात मनसेचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील एकत्रित येण्याच्या चर्चेत, हिंदी भाषेची सक्तीविरोधात राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा आयोजित केला आहे. संजय राऊत यांनी या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे.

तर आम्ही आमच्या तलवारी बाहेर काढू, हिंदी सक्तीविरोधात मनसेचा इशारा
mns
| Updated on: Jun 29, 2025 | 8:12 AM

गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच आता राज्य सरकारच्या हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत ५ जुलै रोजी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. या घोषणेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो शेअर करत हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. आता यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. त्यातच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हिंदी सक्तीविरोधात सरकारला आक्रमक इशारा दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीला तीव्र विरोध केल आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात हिंदी सक्तीचे कोणतेही कलम नाही. महाराष्ट्रात केवळ मराठी भाषेचेच वर्चस्व राहील, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे. जर हिंदीची सक्तीची तलवार आमच्यावर रोखली, तर आम्हीही कोळी आहोत, आमच्या तलवारी बाहेर काढू,” अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला.

आजचा लढा हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखाच

“महाराष्ट्रात काय बोलायचं हे इथला मराठी माणूस ठरवेल, बाहेरून आलेला भय्या नाही. बाहेरच्या भय्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. सध्याचे वातावरण हे मला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखे वाटत आहे. आजचा लढा हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखाच २.० आहे. त्यावेळी मुंबईचा घास घेण्याचा प्रयत्न झाला होता. मुंबई गुजरातला मिळावी यासाठी षडयंत्र रचले जात होते,” अशी आठवण संदीप देशपांडे यांनी करुन दिली.

महाराष्ट्रात फक्त मराठी, मराठी आणि मराठीच चालेल

राष्ट्रीय शिक्षण धोरणात मुलांना तीन भाषा येणे आवश्यक आहे, असे कुठेही नमूद केलेले नाही. आपल्याला हिंदीची गरज काय? आजूबाजूला भय्या बसलेत त्यांच्याकडूनच आपण हिंदी शिकलो. एका चर्चेत एक जण म्हणतो आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदी लागते. मग एलोन मस्क, बिल गेट्स हे हिंदी येत नाही म्हणून रडत असतील,” असे संदीप देशपांडे म्हणाले. यापुढे महाराष्ट्रात फक्त मराठी, मराठी आणि मराठीच चालेल. त्यापेक्षा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मराठी शिकवा. ते लोक इथे येऊन मराठी बोलतील, असा टोलाही संदीप देशपांडेंनी लगावला.