
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीला पुन्हा सत्तेत बसवण्यासाठी गेमचेंजर ठरली. या योजनेनुसार पात्र लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दर महिना दिले जातात. मात्र या योजनेसाठी अनेक विकासकामांचा, विविध विभागाचा निधी वळवण्यात आल्याचा आरोप वारंवार होत असतो. आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या एका आमदाराने लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधीसाठी दिरंगाई होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरुन आरोप – प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतंच इंदापूरमधील घरकुलाच्या धनादेश वाटप कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी इंदापूर तालुक्यातील विकास कामे आणि त्यासाठी मिळणाऱ्या विकास निधीवर सविस्तर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी विकास निधी मिळण्यास विलंब होण्यामागे लाडकी बहीण योजना कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
“मी नेहमीच पाठपुरावा करत असतो. मी मुंबईत असू द्या, पुण्यात असू द्या किंवा कुठेही असू द्या, त्यातून माझ्या इंदापूर तालुक्याला सर्वाधिक निधी कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करत असतो. आज लाडकी बहिण योजनेमुळे निधी यायला थोडा उशीर होत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे निधी मिळण्यास उशीर झाला होता. पण आज सर्व हळूहळू गाडी सुरळीत झाली आहे”, असे दत्तात्रय भरणे म्हणाले.
यापूर्वीही दत्तात्रय भरणे यांनी विकास निधीमध्ये होणाऱ्या दिरंगाईबद्दलही भाष्य केले होते. त्यावेळीही त्यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला होता. आता पुन्हा त्याच मुद्द्यावर भाष्य केल्याने राजकीय समीकरणे आणि निधी वाटपावरून नव्याने चर्चा सुरू झाली आहे. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर ताण येत असल्याचे बोललं जात होतं. तसेच यामुळे इतर विकासकामांच्या निधी वाटपात विलंब होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू होती. मात्र आता खुद्द कॅबिनेट मंत्र्यांनीच अप्रत्यक्षपणे याची कबुली दिल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. त्यांच्या या विधानामुळे विरोधकांना नवा मुद्दा मिळाला आहे.