
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि काल 20 तारखेलाही राज्यातील विविध भागांत नगर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदान झालं, तर आज मतमोजणी होऊन निकाल लागला. या निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाला असून मविआला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला आहे. महायुतीचे 215 नगराध्यक्ष निवडून आले असून मविआच्या वाट्याला फक्त 49 जागा आल्या. महायुतीमध्ये भाजप मोठा पक्ष ठरला असून भाजपला 119, शिवसेना शिंदे गट 60 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 36 नगराध्यक्ष आले आहेत. मविआमध्ये काँग्रेसला 32, शिवसेना (ठाकरे गट) 9 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गाटाला 8 जागा जिंकता आल्या आहेत
दरम्यान या विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत विजयासाठी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. एवढं मोठं यश शिवसेनेला मिळालं आहे, त्याबद्दल मतदारांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो, असं ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी मविआ आणि शिवसेना ठाकरे गटालाही चिमटे काढले. शिवसेनेचा (शिंदे गट) स्ट्राईक रेट चांगले असल्याचे सांगत त्यांनी खरी शिवसेना कोणती हे मतदारांनी दाखवून दिल्याचा पुनरुच्चार करत ठाकरे गटाला डिवचलं.
जेवढ्या संपूर्ण मविआच्या जागा त्यापेक्षाही शिवसेनेच्या जागा जास्त
ठाकरे गटाला अपयश आलं आहे, मविआमध्ये दुफळी निर्माण झालेली आहे का, असा सवाल एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला असता, त्यांनी एका वाक्यात खोचक टोला लगावला. ‘महाविकास आाघाडीची, सगळ्यांची बेरीज पकडली, तरी एकट्या शिवसेनेची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्त आहे, ‘ असं शिंदे म्हणाले. खरी शिवसेना कोणाची हे मतदारांनी या निवडणुकीमध्ये मतदारांनी दाखवून दिलं असं म्हणत त्यांन ठाकरे गटाला पुन्हा डिवचलं.
जनतेच्या न्यायलयात मिळाला कौल
खरी शिवसेना ही शिवसैनिकांची आहे, या महाराष्ट्रातल्या जनतेची आहे, काही लोकांना ही आपली मक्तेदारी वाटत होती . काही लोकं मालक आणि नोकर समजत होते, पण शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे. म्हणूनच इथे कोणीचमालक नाही की कोणी नोकर नाही, इथे आम्ही सर्वच कार्यकर्ते आहोत. म्हणूनच आम्हाला या निवडणुकीत एवढं चांगलं यश मिळालं आहे. काही लोकं निवडणूक आयोगाला बोलत होते, कोर्टावर आरोप करत होते, सगळं चालू होतं. जनतेच्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, पण जनतेच्या न्यायालयाने कौल दिलाय, न्याय दिला आहे. जनतेच्या न्यायालयात खरी शिवसेना कोणाची हे लोकांनी दाखवून दिलं आहे,असं म्हणत शिंदे यांनी ठाकरेंना सुनावलं.