
मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पावसाळी अधिवेशनादरम्यान भर सभागृहात ऑनलाईन रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. यानंतर विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आले. यानंतर आता माणिकराव कोकाटेंवर कारवाई करत त्यांचे खाते बदल करण्यात आले आहे. माणिकराव कोकाटेंवर आता क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे क्रीडामंत्री असलेल्या दत्तात्रय भरणे यांना कृषिमंत्रीपद देण्यात आले आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याप्रकरणी भाष्य करत ठामपणे भूमिका मांडली.
अंजली दमानिया यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलावर त्यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. जर एखादा चांगला मंत्री असता तर तो एका मिनिटात राजीनामा देऊन मोकळा झाला असता. पण आता माणिकराव कोकाटेंना दुसरं पद दिलं गेलं , याला आपण कारवाई म्हणणार का? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.
“माणिकराव कोकाटे हे शेतकरी आहेत. ते १९९९ मध्ये राजकारणात आले, त्यानंतर २०१४ चे अॅफिडेव्हिट आहे त्यात ६ कोटींची संपत्ती होती. २०१९ मध्ये ती २१ कोटी इतकी झाली आणि २०२४ मध्ये तब्बल ४८ कोटी रुपये इतकी संपत्ती झाली. जर इतका चांगला कृषीमंत्री महाराष्ट्राला लाभला होता तर त्यांना त्यांच्या यशाची गुरुकिल्ली काय हे सांगणं गरजेचे होते. ते अधिवेशनात पत्ते खेळत होते. मी त्यांची कुंडली काढली आहे. त्यांनी जवळपास आठ वेळा पक्ष बदल केला. त्यांची बदली करण्यात आली आहे ही कारवाई नाही. ही कारवाई झाली पाहिजे. खाते बदलणं हा मार्ग नव्हता”, असेही अंजली दमानिया म्हणाल्या.
यावेळी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. “धनंजय मुंडे हा माणूस मला मंत्री म्हणून अजिबात नको आहे. वाटेल ते झाले तरी ते राजकारणात आले नाही पाहिजेत,” अशी थेट भूमिका त्यांनी मांडली. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत तुम्हाला जनता दाखवेल. धनंजय मुंडे हा माणूस मंत्री म्हणून मला अजिबात नको. वाटेल ते झालं तरी ते राजकारणात नाही आले पाहिजे. सगळ्यांनी वॉर्निंग ही मुख्यमंत्र्यांना द्या. राष्ट्रवादी पक्षाला जनतेच्या भावनेची पडलेली नाही. सत्तेशिवाय जगू शकत नाही. म्हणून त्यांना ते पद परत हवं आहे, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला. या आरोपांनंतर आगामी काळात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.