राज ठाकरेंसोबत युती म्हणजे उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी चूक, बड्या नेत्याच्या विधानाची चर्चा!
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. मात्र उद्धव ठाकरे मोठी चूक करत आहेत, असे भाकित एका बड्या नेत्याने केले आहे.

Ramdas Athwale : राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. या निवडणुकीत मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी सर्वच पक्ष जीवाचं रान करत आहेत. महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी राजकीय डावपेच आखत आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यामुळेच शिवसेनेचे दोन्ही गट मतदारांना आकर्षित करण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहेत. ठाकरे आपली ताकद वाढवण्यासाठी मनसेसोबत युती करण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी जागावाटपावर चर्चा चालू आहे. दुसरीकडे महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र येऊन मतविभाजन होणार नाही, याची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असतानाच आता महायुतीचा घटकपक्ष असलेल्या आरपीआय (आठवले गट) पक्षाचे प्रमुख तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना सोबत घेणे ही उद्धव ठाकरेंची मोठी मोठी चूक आहे, असे मत व्यक्त केले आहे.
उद्धव ठाकरेंचं नुकसान होणार
रामदास आठवले हे सांगलीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबई महापालिका, मनसे-ठाकरे यांची युती यावर भाष्य केले. यावेळी बोलताना राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने उद्धव ठाकरेंचं नुकसान होणार असून राज ठाकरेंना सोबत घेणं उद्धव ठाकरेंची मोठी चुक आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईत एकत्र आल्यामुळे मुंबईतील नॉन मराठी मते महायुतीला मिळतील. मुंबईतील मराठी मते महायुती, काँग्रेस आणि ठाकरे बंधूंना मिळणार आहेत त्यामुळे मराठी मतात मोठी फूट होणार आहे, असे राजकीय भाकित आठवले यांनी केले.+
राज ठाकरेंचा आम्हाला काहीही फायदा झाला नाही
त्याचबरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मोठे नुकसान होणार आहे. राज ठाकरे यांना सोबत घेण्याची चूक उद्धव ठाकरे यांनी करायला नको होती, असे मतही आठवले यांनी व्यक्त केले. राज ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीत आमच्यासोबत होते. तेव्हा आम्हाला त्यांचा काहीही फायदा झाला नाही. विधानसभेला राज ठाकरे आमच्यासोबत नव्हते. त्यामुळे आमचा जास्त फायदा झाला, असा निवडणुकीचा इतिहासही त्यांनी पुन्हा सांगितला. राज ठाकरे उत्कृष्ट वक्ते आहेत. ते उत्कृष्ट इव्हेंट मॅनेजमेंट करतात. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होते. पण त्यांना मतं मिळत नाहीत, असा टोलादेखील रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना लगावला.
तसेच उद्धव आणि राज यांची युती झाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे. त्याचा फायदा आम्हाला महाराष्ट्रात होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. त्यामुळे रामदास आठवले यांनी मांडलेले तर्क किती सत्यात उतरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
