महाराष्ट्रात रोज नवा घोटाळा, संजय राऊतांनी महायुतीच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची कुंडलीच मांडली, म्हणाले अजित पवार, संजय शिरसाट…

शिंदे सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा प्रमाण वाढल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. सामना वृत्तपत्रातील अग्रलेखात MMRDA टेंडर घोटाळा, धुळ्यातील बेहिशेबी रक्कम, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि आमदारांकडून रॉयल्टी चोरी यासारख्या अनेक प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात रोज नवा घोटाळा, संजय राऊतांनी महायुतीच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची कुंडलीच मांडली, म्हणाले अजित पवार, संजय शिरसाट...
sanjay raut
| Updated on: Jun 30, 2025 | 8:19 AM

आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. लुटारू सरकारला रोज चाबकाचे फटके विधानसभेत मारावेत असा यांचा कारभार आहे, पण विधानसभेत विरोधी पक्षाला मान द्यायचा नाही, विरोधकांचा आवाज दाबायचा असे लुटारू सरकारचे धोरण आहे. महाराष्ट्रात सध्या भ्रष्टाचाराचा धुमधडाका चालला आहे, तो रोखायचा कोणी, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत. त्यासोबतच अनेक कथित घोटाळ्यांचा पाढा वाचण्यात आला आहे. यात ‘एमएमआरडीए’च्या ३ हजार कोटींच्या टेंडर घोटाळ्यापासून ते धुळ्यात सापडलेल्या बेहिशेबी रकमेपर्यंत आणि मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या नावावर कोट्यवधींच्या मालमत्तेचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय विभागावर भ्रष्टाचाराचा ठपका आहे. राज्यव्यवस्था भ्रष्ट झाली असून, आमदारांना निवडून आणण्यासाठी ५० ते १०० कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा दावा अग्रलेखात करण्यात आला आहे. यामुळे भ्रष्टाचाराला ‘मुक्त रान’ मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात सावळा गोंधळ सुरू आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. ‘एमएमआरडीए’च्या एकाच टेंडरमध्ये तीन हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आले व ते टेंडरच शेवटी रद्द करावे लागले. महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे हे चित्र विषण्ण करणारे आहे, असेही सामनातून म्हटले आहे.

सामनातून टीका

धुळ्यातील बेहिशेबी रक्कम: धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात २१ मे रोजी १ कोटी ८४ लाखांची बेहिशेबी रक्कम सापडली होती. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी SIT चौकशीचे आदेश दिले असले तरी, त्यात पुढे काहीही झाले नसल्याचा आरोप आहे.

मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप: शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या चिरंजीवांनी ‘वेदांत’ हॉटेल ६५ कोटींना बेकायदेशीरपणे लिलावात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ‘सामना’ने केला आहे. तसेच, सामाजिक न्याय विभागाचे मंत्री ६५ कोटींची जमवाजमव कोठून करतात, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

वाहनचालकाच्या नावे १५० कोटींची मालमत्ता: खासदार संदिपान भुमरे यांच्या वाहनचालकाच्या नावे १५० कोटींची मालमत्ता असल्याचे उघड झाले असून, ही भुमरेंचीच बेनामी मालमत्ता असल्याचा संशय ‘सामना’ने व्यक्त केला आहे.

आमदारांकडून ‘रॉयल्टी’ची चोरी: मावळचे आमदार सुनील शेळके हे राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या जमिनीत बेकायदा खाणी चालवून हजारो कोटींचे उत्पन्न मिळवत असून, सरकारची शेकडो कोटींची ‘रॉयल्टी’ बुडवत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

माळेगाव साखर कारखाना निवडणूक: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक जिंकण्यासाठी मतास २० हजार रुपये दिल्याचे आणि कारखान्याला ५०० कोटी रुपये मंजूर करण्याचे प्रलोभन दिल्याचे ‘सामना’ने म्हटले आहे. याला सरकारी यंत्रणा व पैशांचा अपहार असे संबोधले आहे.

सर्वाधिक भ्रष्टाचार होणाऱ्या राज्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

हे सर्व प्रकार संसदीय लोकशाहीसाठी गंभीर आणि चिंताजनक आहे. विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती टाळली जात असल्याने सरकार भ्रष्टाचाराला संरक्षण देत असल्याचा आरोप अग्रलेखात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोज भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवण्याची भाषा करतात. पण हे ढोंग असल्याचा हल्ला सामनातून करण्यात आला आहे. सर्वाधिक भ्रष्टाचार होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि मुख्यमंत्री रोज उठून भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवण्याची भाषा करतात, हे ढोंग आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता नियुक्त झाला तर सरकारच्या ढोंगावर आणि भ्रष्ट मंत्र्यांवर जोरदार हल्ले केले जातील आणि सरकारला विधानसभेतून पळ काढावा लागेल. याच भीतीमुळे विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती टाळली जात असेल तर संसदीय लोकशाहीसाठी हे लक्षण चांगले नाही, अशीही टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली.