
महाराष्ट्रात गेल्या २४ ते ४८ तासांत विविध शहरात अपघातांची मालिका सुरू आहे. यात अनेकांना जीव गमवावा लागला. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. ठाणे, रायगड आणि नांदेडमध्ये झालेल्या भीषण अपघातांच्या घटना समोर आल्या आहेत. ठाणे, रायगड आणि नांदेडमध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याचे काही फोटो आणि व्हिडीओही समोर आले आहेत.
ठाणे शहरात शनिवारी दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिस दलात कार्यरत असलेले सुरेश भालेराव यांना डंपरने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरीकडे, घोडबंदर नागला बंदर येथे एका अज्ञात वाहनाने दुचाकीवर प्रवास करणाऱ्या गजल तुटेजा या महिलेला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणांमध्ये स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.
रायगड जिल्ह्यातील मुरुड-अलिबाग रस्त्यावर बारशिव गावच्या परिसरात काल संध्याकाळी एक भीषण अपघात घडला. मुरुडकडून अलिबागच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव एस क्रॉस कारने अलिबागकडून मुरुडच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पळून गेला. ज्यामुळे रायगडमध्ये ‘हिट अँड रन’ प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांनी मुरुड पोलिसांत तक्रार दाखल केली असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे.
तसेच रायगडमध्ये आणखी एका ठिकाणी अपघात झाला. माणगावहून कुंभेकडे जाणाऱ्या एसटी बसला निजामपूरजवळ अपघात झाला. रस्त्याच्या कडेला साइड घेत असताना बस अचानक घसरून पलटी झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण तरी १० प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमींना माणगाव सरकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे एसटी बस पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. नरसीहून धर्माबादकडे जाणारी एसटी बस चिकना फाटा येथे अचानक पलटी झाली. या अपघातात १० ते १२ जण जखमी झाले आहेत. यात काही शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. जखमींवर धर्माबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर तीन गंभीर जखमींना नांदेड येथे हलवण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका कारला वाचवण्याच्या प्रयत्नात बस रस्त्यावरून खाली उतरून पलटी झाली. या विचित्र अपघातात एक दुचाकीस्वारही जखमी झाला आहे.
या सर्व अपघातांमुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांना वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्थानिक पोलीस यंत्रणा या सर्व घटनांचा सखोल तपास करत आहे.