रात्रीस खेळ चाले! दोन बाईक, पांढरी पिशवी अन् पाकिट… पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम, कुठे काय घडलं?
नालासोपारा येथे १० लाख ९ हजार रुपयांची रोकड पकडली असून, मतदारांना पैसे वाटप करण्याचा आरोप करण्यात आला आहे. पेल्हार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा अंतिम टप्पा सध्या सुरु आहे, येत्या १५ जानेवारीला नालासोपाऱ्यात मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. नालासोपारा परिसरात निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू असतानाच एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. पेल्हार पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री ही मोठी कारवाई केली. एका दुचाकीवरून नेली जाणारी १० लाख ९ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पेल्हार ब्रिज परिसरात गुरुवारी आणि शुक्रवारी दरम्यानच्या मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पोलीस गस्त घालत होते. यावेळी दोन तरुण दोन ॲक्टिव्हा गाड्यांवरून संशयास्पदरित्या जात असल्याचे पोलिसांना आढळले. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना अडवले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एका प्लास्टिक पिशवीत आढळली. या प्लास्टिक पिशवीत वेगवेगळ्या पाकिटांमध्ये पैसे भरण्यात आले होते. ही रक्कम १० लाख ९ हजार इतकी होती.
या रकमेबाबत तरुणांन विचारले असता, त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे किंवा समाधानकारक स्पष्टीकरण नव्हते. त्यामुळे पोलिसांनी ही रक्कम जप्त केली. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्या दोन ॲक्टिव्हा गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.
ही रोकड जप्त झाल्यानंतर नालासोपाऱ्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सदर रक्कम भाजपकडून मतदारांना प्रलोभन देण्यासाठी वाटण्यात येणार होती, असा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत एवढी मोठी रक्कम सापडल्याने मतदारांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.
मुद्देमाल जप्त, कडक कारवाई केली जाणार
याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १७३ (निवडणुकीत लाच देणे किंवा स्वीकारणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यावेळी साधारण १० लाख ०९००० रुपये रोख आणि २ ॲक्टिव्हा दुचाकी हा मुद्देमाल जप्त केला आहे.
आता ही रक्कम नेमकी कोणाची होती आणि ती कोणापर्यंत पोहोचवली जाणार होती, याचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करत आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, नालासोपारा आणि वसई-विरार परिसरात स्थिर सर्वेक्षण पथके (SST) तैनात करण्यात आली असून नाक्यानाक्यावर वाहनांची तपासणी कडक करण्यात आली आहे.
