
राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, जशी-जशी मतदानाची तारीख जवळ येत आहे, तशी-तशी प्रचारात देखील रंगत आल्याचं पहायला मिळत आहे. राज्यात महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून सभांचा धडाका सुरू झाला आहे, तर दुसरीकडे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पहयाला मिळत आहे. एकीकडे सभा आणि बैठकांमधून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे, प्रत्येक पक्षांकडून मतदारांसमोर आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न होत आहे, तर दुसरीकडे पक्षांतराला देखील वेग आल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटात मोठा पक्ष प्रवेश होणार आहे.
आधी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याचं पहायला मिळालं होतं, आपल्या पक्षाकडून तिकीट मिळणार नसल्याचं दिसताच अनेक इच्छुकांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता, सर्वात जास्त इनकमिंग त्यावेळी भाजपात झालं होतं, याचा मोठा फटका हा महाविकास आघाडीला तर बसलाच होता, सोबतच शिवसेना शिंदे गटाला देखील बसला होता, त्यावरून त्यावेळी शिवसेना शिंदे गटानं नाराजी देखील व्यक्त केली होती.
दरम्यान यावेळी मात्र राजकीय समिकरणं बदलली आहेत, महापालिका निवडणुकीसाठी भाजपने अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटासोबत युती केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील पक्षप्रवेश सुरूच असून, आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि माजी नगरसेवक तसेच माजी विरोधी पक्षनेते कुलदीपसिंग ठाकूर यांनी मोठा निर्णय घेतला आहे, ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अन्य 38 पदाधिकाऱ्यांचा देखील एकत्रित पक्षप्रवेश होणार आहे, त्यामुळे आता लातूर महानगर पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.