आकड्यांवर मोठा भाऊ ठरत नाही… नगरपरिषदेचा निकाल येताच शिंदे गटाकडून भाजपला राग देण्यास सुरुवात

नगरपरिषद निवडणुकीतील विजयाने शिंदे गट चांगलाच आत्मविश्वासपूर्ण झाला आहे. स्वबळावर 57 जागा जिंकल्यानंतर, आता त्यांनी आगामी 29 महापालिका निवडणुकांमध्ये भाजपसमोर सन्मानजनक जागावाटपाची मागणी केली आहे. भाजप योग्य जागा न दिल्यास शिंदे गट स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे, ज्यामुळे मुंबई ते नागपूर भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

आकड्यांवर मोठा भाऊ ठरत नाही... नगरपरिषदेचा निकाल येताच शिंदे गटाकडून भाजपला राग देण्यास सुरुवात
शिंदे गटाकडून भाजपला सांगणं काय ?
Image Credit source: social media
| Updated on: Dec 22, 2025 | 11:21 AM

नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल आले आहेत. या निवडणुकीत शिंदे गटाला स्वबळावर लढून 57 जागा मिळाल्या आहेत. कोणतंही बॅकिंग नसताना केवळ मेहनतीच्या जोरावर हा विजय मिळाल्याने शिंदे गटामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळेच शिंदे गटाने आता थेट भाजपला राग देण्यास सुरुवात केली आहे. राज्यात आता 29 महापालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला सन्मानजनक जागा हव्या आहेत. नाही तर शिंदे गटाने स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी तशी जाहीर वाच्यता करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंत भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ज्या महापालिकांवर भाजपला वर्चस्व मिळवायचे आहे, तिथेच शिंदे गट खोडा घालण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

नाशिक महापालिका राज्यातील महत्त्वाची महापालिका आहे. या महापालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाचे नेते अजय बोरस्ते यांनी तर निकालानंतर थेट भाजपला इशाराच दिला आहे. आम्ही भाजपकडे 45 जागांची मागणी केली आहे. आम्हाला सन्मानपूर्वक जागा द्या, अन्यथा स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. नगरपरिषद निवडणुकीत आम्ही दाखवून दिलं आहे. आमची ताकद काय आहे हे आम्ही दाखवून दिली आहे, त्यामुळे आम्हाला सन्मानपूर्वक जागा हव्यातच, असं विधान अजय बोरस्ते यांनी केलं आहे. बोरस्ते यांच्या या विधानाने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

आकड्यांवर मोठा भाऊ ठरत नाही

युती करायची तर खुल्या दिलाने करा. मोठा भाऊ फक्त आकड्यावर ठरत नाही, तर वागण्यावर देखील ठरतो, असं सुनावतानाच नगरपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर आता महापालिकांमध्ये युतीबाबत आम्ही अहवाल एकनाथ शिंदेंकडे पाठवला आहे, अशी माहितीही अजय बोरस्ते यांनी दिली.

तर पुण्यात स्वबळावर

दरम्यान, भाजप आणि शिवसेनेची महायुती करण्यासाठी शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आज पुण्यात येणार आहेत. पुण्यात जागा वाटपावरून भाजप शिवसेना युती चर्चा रेंगाळली आहे. भाजपाच्या वरिष्ठ स्तरावरून आणि शिवसेनेकडून झालेल्या बैठकीतील महायुती तोडगा निघत नसल्याने उदय सामंत पुण्यात येणार आहेत. शिवसेनेकडून समाधानकारक 35 जागेची मागणी केली आहे. पण भाजपाकडून एवढ्या जागा सोडण्याची तयारी नाही. त्यामुळे पेच फसला आहे. त्यावर सामंत काय तोडगा काढतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मूळ शिवसेना चिन्हावर किती नगरसेवक निवडून आले? मग एवढ्या जागा कशाला मागता? असा सवाल भाजपाकडून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना केला जात आहे. तर भाजप समाधानकारक जागा देणार नसेल तर आम्ही स्वबळावर लढू, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

50-50 जागा हव्यात

नांदेड महानगरपालिकेसाठी भाजपाने शिवसेनेला सहा जागांचा प्रस्ताव दिला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीत हेमंत पाटील याबाबतचा प्रस्ताव मांडणार आहेत. आम्ही भाजपासोबत फिफ्टी-फिफ्टी जागेची मागणी केली आहे. त्यांनी दिल्या नाहीतर आम्ही स्वबळावर लढू, असं हेमंत पाटील यांनी म्हटलं आहे. 50 टक्के जागा मिळवण्यावर आम्ही ठाम असल्याचं पाटील म्हणाले. शिवसेनेच्या आमदाराची नांदेड महानगरपालिकेच्या अनुषंगाने उद्या तातडीची बैठक बोलावण्यात आल्याची माहितीही आमदार हेमंत पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात मुखेड आणि हदगाव दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष बसले आहेत. जिल्ह्यात शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी युतीचे प्राबल्य आहे. किनवट एका ठिकाणी उबाठाचा नगराध्यक्ष आला असला तरी तो आमचा जुना शिवसैनिक आहे. आम्हाला अपेक्षित यश म्हणावं तसं मिळालं नाही, काही ठिकाणी नगरसेवक येणे अपेक्षित होते, असं त्यांनी म्हटलंय.