मुख्यमंत्री फक्त मुंबईत बसून घोषणा करतात, पंचनामे करण्यास दिरंगाई झाल्यास ठाकरे गट रस्त्यावर उतरेल, आमदार आमश्या पाडवी यांचा इशारा

| Updated on: Mar 20, 2023 | 2:01 PM

नंदूरबार जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान केला आहे. तर दुसरीकडे नदीनाले ओसंडून वाहू लागले आहेत.

मुख्यमंत्री फक्त मुंबईत बसून घोषणा करतात, पंचनामे करण्यास दिरंगाई झाल्यास ठाकरे गट रस्त्यावर उतरेल, आमदार आमश्या पाडवी यांचा इशारा
nandurbar unseasonal rain
Image Credit source: tv9marathi
Follow us on

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पावसाने (Unseosonal Rain) धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे (Farmer) कंबरडे मोडले आहे. गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, मका, केळी, पपई पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र अजूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकार मुंबईत बसून घोषणा करत असते, मात्र शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत तर सोडाच पंचनामासाठी ही प्रतीक्षा करावी लागते. यापेक्षा दुर्दैव म्हणजे सरकार फक्त घोषणांचा गाजर दाखवते. मुख्यमंत्री घोषणा करतात मात्र त्यांची अंमलबजावणी होत नाही, अशी घाणाघाती टीका ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी केले आहे. येत्या दोन दिवसात जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले नाही, तर ठाकरे गट रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

गारपिटीचा फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसला

नंदुरबार जिल्ह्यात दहा हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आली आहे. मात्र गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका हा नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. विषाणूजन्य रोगांमुळे पपईची पानगळ झाली होती. त्यातच झालेल्या गारपिटीमुळे राहिलेले पान सुद्धा गळून पडले आहे. गारांचा मारा पपईच्या फळाला लागल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे झाडावरील पानांची छत्री गेल्याने उन्हाचाही फटका पपईच्या पिकांना बसत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पानगळ आणि गारपीट दोघींमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उन्हापासून पपईच्या फळांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी कापडच्या साह्याने फळे झाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून सरकारने पपई उत्पादकांसाठी नुकसान भरपाई सोबतच विशेष अनुदानाची सोय करावी अशी मागणी शेतकरी राजेंद्र पाटील यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

अवकाळी पावसामुळे सातपुड्याच्या नद्यांना आला पूर

नंदूरबार जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान केला आहे. तर दुसरीकडे नदीनाले ओसंडून वाहू लागले आहेत. नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव, शहादा आणि अक्कलकुवा भागात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे सातपुड्याच्या नद्यांना आता पूर येऊ लागला आहे. पुराची तीव्रता बघून आपल्याला असं वाटेल की जणू आता पावसाळा चालू झाला आहे की काय ? हे आस्मानी संकट आता अजून कधी दिवस चालणार आहे असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे.