Maharashtra News LIVE : निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांकडून देशभरात आंदोलनाचं रणशिंग
Maharashtra News LIVE : निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांकडून देशभरात आंदोलनाचं रणशिंग फुंकण्यात आलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यासाठी काँग्रेसकडून देशभरात आंदोलनं करण्यात येत असून विरोधक रस्त्यावर उतरले आहेत.

LIVE NEWS & UPDATES
-
ताकद वाढली,सन्मानजनक जागा द्या- आमदार सुहास बाबरांची मागणी
सांगली जिल्ह्यात आमची ताकद वाढली आहे,त्यामुळे आम्हाला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत,अशी सूचक मागणी शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपाकडे केली आहे.तसेच आमचा वाटा वाढवून घेऊ,जो सन्मानजनक प्रस्ताव देईल,अश्या शब्दात सूचक इशारा देखील आमदार सुहास बाबर यांनी भाजपाला दिला आहे,पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून महायुती एकत्रित लढणार असल्याचं जाहीर केलं आहे,मात्र सुहास बाबर यांच्या भूमिकेमुळ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जागा वाटपात महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे पक्षाकडून चौघांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत,यावेळी ते बोलत होते.
-
आरक्षणच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन
अनुसूचित जाती-जमाती च्या आरक्षणच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ अनेक सामाजिक संघटनांच आंदोलन हे आज आझाद मैदानमध्ये होणार आहे. काही राजकीय पक्षांनी या आरक्षणच्या उपवर्गीकरण ला विरोध केला आहे आज आझाद मैदानावर मातंग,ढोर,वाल्मिकी,मादीगा समाजातील बांधव हे उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ एकवटणार आहेत
-
-
आचारसंहितेमुळे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुकला?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना अजून मेट्रोसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो मार्ग ३ च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच आता या प्रकल्पावर आचारसंहितेचे सावट निर्माण झाले आहे.
-
‘आदिवासी जेन झी’च्या उलगुलान मोर्चाचा आज दुसरा दिवस; आंदोलक मुंबईच्या दिशेने पुढे सरकले
नाशिकमध्ये सुरू असलेल्या ‘आदिवासी जेन झी’च्या उलगुलान मोर्चाचा आज दुसरा दिवस असून, आंदोलक मुंबईच्या दिशेने पुढे सरकले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी हा मोर्चा काढण्यात आला असून, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी, सेंट्रल किचन पद्धत बंद करण्याची तसेच सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत देण्याची प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.
-
नाशिकच्या विमानतळाला ‘जटायू विमानतळ’ असे नाव देण्याची मागणी
नाशिकच्या विमानतळाला ‘जटायू विमानतळ’ असे नाव देण्याची मागणी पुढे आली आहे. महंत भक्ती चरणदास महाराज यांच्याकडून याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. रामायणातील कथेनुसार, माता सीतेला रावणापासून वाचवण्यासाठी जटायूने आकाशात उड्डाण करून प्रतिकार केला होता. नाशिक विमानतळाचे अद्याप अधिकृत नामकरण झालेले नसल्याने, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाला जटायूचे नाव देणे योग्य ठरेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.
-
-
काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या निधीवरून राज्य सरकारवर आरोप केले
नंदुरबारमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या निधीवरून राज्य सरकारवर आरोप केले आहेत. या योजनेमुळे आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला. अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेल्या योजनांना पुरेसा निधी देण्याची सरकारची इच्छा नसल्याचा आरोपही वळवी यांनी केला. तसेच निधीअभावी आदिवासी विकास विभागातील काही योजना रखडल्या असून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांवरही त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले.
-
महाराष्ट्राची धुरा सक्षमपणे सांभाळण्याची क्षमता एकनाथ शिंदे यांच्यात- आमदार चंद्रकांत रघुवंशी
नंदुरबारमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी राज्याच्या नेतृत्वाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राची धुरा सक्षमपणे सांभाळण्याची क्षमता एकनाथ शिंदे यांच्यात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिंदे यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात लोकांच्या मनात स्थान निर्माण केल्याचा दावाही रघुवंशी यांनी केला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्याची चर्चा असल्याचा संदर्भ देत, महाराष्ट्राचे नेतृत्व केंद्रातही असणे आवश्यक असल्याचे रघुवंशी म्हणाले. फडणवीस केंद्रात गेल्यास राज्याची धुरा सांभाळण्यासाठी एकनाथ शिंदे पात्र आणि योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षाही आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी यावेळी व्यक्त केली.
-
नाशिक जिल्ह्यात दुष्काळी यादीत समावेश न झालेल्या चार तालुक्यांची पुन्हा पाहणी
नाशिक जिल्ह्यात दुष्काळी यादीत समावेश न झालेल्या चांदवड, निफाड, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी या चार तालुक्यांची पुन्हा पाहणी करण्यात येणार आहे. या तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. पीक नुकसानीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी जिल्ह्यात तब्बल २,९०० पीक कापणी प्रयोग राबविण्यात येणार आहेत.
-
आमदार- खासदारांना सन्मानाची वागणूक देत त्यांच्याशी सुसंवाद ठेवण्याचे प्रशासनाला निर्देश
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी प्रशासनाला आमदार आणि खासदारांना सन्मानाची वागणूक देत त्यांच्याशी सुसंवाद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधींच्या पत्रांवर तातडीने कार्यवाही करून त्यांना जास्तीत जास्त दोन महिन्यांत अंतिम उत्तर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात लोकप्रतिनिधींच्या पत्रव्यवहारासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवण्याचे तसेच दर तीन महिन्यांनी त्याचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी फोनवरही आदरयुक्त भाषा वापरावी, महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी आमदार-खासदारांच्या भेटीसाठी वेळ राखीव ठेवावा, तसेच शासकीय कार्यक्रमांना सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या आदेशांचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
-
अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर इथं भाविकांची मोठी गर्दी
आज अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर इथं भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पितृपक्षातील चतुर्थी आणि मंगळवार असल्याने आजच्या संकष्टीला विशेष महत्त्व आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने मंदिराची फुलांनी आकर्षक सजावट, तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये आणि दर्शन व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी मंदिर प्रशासनाकडून विशेष नियोजन आणि आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांकडून देशभरात आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेससह विविध विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, 2 ऑक्टोबरला दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. प्रशांत भूषण यांच्यासह काही आंदोलक नेत्यांनी आंदोलनाची पूर्वसूचना दिली आहे. महाराष्ट्रातही या मुद्द्यावर राजकीय हालचाली वाढल्या असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेकडून रविवारी मुंबईत मोर्चा काढण्याची तयारी आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यासह राज्य, क्रीडा, मनोरंजन आणि राष्ट्रीय क्षेत्रातील इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..