
Maharashtra Panchayat Samiti Election Results : महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाची मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल सध्या जाहीर होत आहे. या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. भाजपने ग्रामीण भागात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपने मोठी मुसंडी मारल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांना एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांना भक्कम साथ दिल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रातील एकूण १२५ पंचायत समित्यांपैकी १११ समित्यांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. यामध्ये भाजपने ४५ जागांसह अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक बालेकिल्ल्यांना भाजपने खिंडार पाडले आहे.
| पक्ष | विजयी पंचायत समित्या |
| भाजप | ४५ |
| शिवसेना (शिंदे गट) | २४ |
| राष्ट्रवादी (अजित पवार) | २० |
| राष्ट्रवादी (शरद पवार) | ०८ |
| काँग्रेस | ०८ |
| शिवसेना (ठाकरे गट) | ०५ |
| इतर | ०१ |
| एकूण | १११/१२५ |
जिल्हा परिषदेच्या निकालांनी महाविकास आघाडीच्या चिंतेत भर टाकली आहे. १२ पैकी ७ जिल्हा परिषदांवर भाजपने आपला झेंडा फडकवला आहे.
| पक्ष | विजयी जिल्हा परिषदा |
| भारतीय जनता पक्ष (BJP) | ०७ |
| शिवसेना (एकनाथ शिंदे गट) | ०३ |
| राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) | ०१ |
| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ०१ |
| राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) | ०० |
| शिवसेना (उद्धव ठाकरे गट) | ०० |
| इतर / अपक्ष | ०० |
| एकूण | १२ |
दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचा क्लीन स्वीप पाहायला मिळत आहे. १२ पैकी ११ जिल्हा परिषदांवर महायुतीने भाजप+शिंदे+अजित पवार गटाने विजय मिळवला आहे. यातील एकूण जागांपैकी निम्म्याहून अधिक ७ जिल्हा परिषदा एकट्या भाजपने जिंकल्या आहे. ग्रामीण मतदारांचा कौल त्यांच्या बाजूने स्पष्ट दिसत आहे. या निकालाने मविआला घरघर लागल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही महत्त्वाच्या पक्षांना एकाही जिल्हा परिषदेत सत्ता मिळवता आलेली नाही, जो त्यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.