
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत मोठा राडा झाल्याची घटना घडली. सुनील तटकरे यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. सुनील तटकरे यांची लातूरमध्ये पत्रकार परिषद सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात निवेदन द्यायला आलेल्या काही कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले. त्यानंतर संतापलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेनंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. आता या घटनेचे राजकीय पडसाद उमटत आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भाष्य केले. राज्यात गुंडाराज सुरू आहे, अशी भीती रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली आहे.
या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, “महाराष्ट्रात आता काय बघायला मिळणार आहे याची आता कल्पना करता येत नाही… Tom, Dick, Harry च्या कृपेमुळे महाराष्ट्रात आता हे सगळं घडत आहे. मला भीती आहे की उद्या उत्तर प्रदेश, बिहारचे लोक म्हणू नये की आमच्या इथे महाराष्ट्रासारखी परिस्थिती नको!” असे रोहिणी खडसे यांनी म्हटले.
महाराष्ट्रात आता काय बघायला मिळणार आहे याची आता कल्पना करता येत नाही…
लातूर येथील विश्रामगृहात खा. @SunilTatkare यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी तिथे आले व त्यांनी कृषीमंत्र्यांनी केलेल्या कृतीबाबत तटकरे यांना जाब विचारला. यावेळी या… pic.twitter.com/vRQCDlRCpq
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) July 20, 2025
लातूर येथील विश्रामगृहात खासदार सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी तिथे आले आणि त्यांनी कृषीमंत्र्यांनी केलेल्या कृतीबाबत तटकरे यांना जाब विचारला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना तीव्रपणे व्यक्त केल्या. तर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. महाराष्ट्रात असे प्रकार यापूर्वी कधीच पाहायला मिळत नव्हते, असेही रोहिणी खडसे यांनी नमूद केले. या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे.