Sharad Pawar : शरद पवार यांना मोठा धक्का बसणार, बडा नेता अजितदादांच्या पक्षात येणार; माजी मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

आता काटा उलटा फिरायला लागलाय, लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत.थोडया दिवसात ते भाजपात येतील", असे विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदाराबद्दल केलं होतं. त्यामुळे खळबळ माजली,

Sharad Pawar : शरद पवार यांना मोठा धक्का बसणार, बडा नेता अजितदादांच्या पक्षात येणार; माजी मंत्र्याच्या दाव्याने खळबळ
शरद पवार यांना मोठा धक्का बसणार ?
Image Credit source: social media
| Updated on: Feb 05, 2026 | 1:17 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बऱ्याच घडामोडी घडत असून पक्षातील आऊटगोईंग आणि इनकमिंगही वेगाने सुरूच आहे. लोकसभा निवडणूक, विधानसभा, महापालिक निवडणूक या काळात तर पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेशाला वेगच आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात विलीनीकरणाबाबत बोलणं सुरू होतं . मात्र अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर या चर्चांना खीळ बसला.

याचदरम्यान सांगलीमध्ये दोन नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलेला दिसत आहे. थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपात येतील असं विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे चांगलीच खळबळ माजली असून जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा सुरू झाली. तसे झाल्यास शरद पवारांना मोठा धक्का बसू शकतो. मात्र त्यांच्या या विधानावर जयंत पाटील यांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दहा पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेला आहे, आणि तोच मला म्हणतोय की मी भाजप मध्ये जाणार, असं म्हणत जयंत पाटील यांनी खोत यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हणाले होते सदाभाऊ खोत ?

काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी खळबळजनक विधान केलं होतं. ” आता काटा उलटा फिरायला लागलाय, लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत.थोडया दिवसात ते भाजपात येतील”, असे विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या बाबतीत केले होते. भाजपाने त्यांना घ्यायचं का नाही, ते बघावे, कारण सत्ते विना ते बाळ जगू शकत नाही.कधी उडी मारायचे, ते बघायला लागले आहे. असा टोला देखील जयंत पाटलांचं नाव न घेता सदाभाऊ खोतांनी लगावला होता. सांगलीच्या वाळवा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेना महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल हे भाष्य केलं होतं.

पडक्या घरात कोण मुक्कामाला जातयं का ? सदाभाऊ खोतांचा जयंत पाटलांना खोचक टोला

राष्ट्रवादी विलनीकरणाबाबत जयंत पाटलांनी केलेल्या विधानावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यांची खिल्ली उडवली. म्हणे अजित दादा जयंत पाटील यांच्याकडे हेलपाटे मारत होते. तुमच्याकडे काय पाच-पन्नास आमदार आहेत का ? अरे तुमच्या पडक्या घरात मुक्कामाला कोणी जातंय का ? अजित दादा केवढा मोठा माणूस. ते गेल्यावर अक्खा महाराष्ट्र हळहळला, असं म्हणते सदाभाऊ खोतांनी जयंत पाटलांना टोला लगावला.

तर एक रिक्षावाला माणूस उपमुख्यमंत्री झाला आणि एक माणूस आग लावत सुटलाय. राष्ट्रवादी एक करायला दादा तुमच्याकडे हेलपाटे मारायला,तुमच्याकडे काय पाच-पन्नास आमदार आहेत का ? पडक्या घरात मुक्कामाला कोणी जातंय का ? असा खोचक टोलाही त्यांनी मारला. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या कासेगाव येथे पार पडलेल्या प्रचार सभे प्रसंगी ते बोलत होते.

जयंत पाटील यांचं खोतांना प्रत्युतर

खोतांच्या टीकेवर जयंत पाटील यांनीही भाष्य करत त्यांना प्रत्युत्तर दिलं. ते वाळवा येथील जाहीर सभेत ते बोलत होते. ” दहा पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेला आहे, आणि तोच मला म्हणतोय भाजप मध्ये जाणार”. जयंत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेवर भाष्य करत त्यांच्यावरच निशाणा साधला.