एकीकडे मृत्यूशी झुंज, दुसरीकडे रस्त्याशी संघर्ष; पॅरालिसिस झालेल्या आजीसाठी गावकऱ्यांची चिखलातून पायपीट

भोर तालुक्यातील म्हसरबुदुक गावातील शिंदेवस्तीत आरोग्यसेवांचा अभाव आणि वाईट रस्त्यांमुळे एका वृद्ध महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी डालातून नेण्याची वेदनादायक घटना घडली. पावसाळ्यात रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था असल्याने अनेक ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचणे कठीण आहे.

एकीकडे मृत्यूशी झुंज, दुसरीकडे रस्त्याशी संघर्ष;  पॅरालिसिस झालेल्या आजीसाठी गावकऱ्यांची चिखलातून पायपीट
pune women
| Updated on: Jul 15, 2025 | 11:44 AM

मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मेट्रो शहरात महामार्गांवर सिमेंटचे जंगल उभे राहत असताना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या दुर्गम डोंगरी भागात मात्र एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. स्वातंत्र्याची ७८ वर्षे उलटली तरी, म्हसरबुदुक गावातील शिंदेवस्तीच्या नशिबी अजूनही विकासाचा रस्ता झालेला नाही. इथे आरोग्य सेवा अजूनही डालातून प्रवास करते, हेच सोमवारी घडलेल्या एका घटनेतून समोर आले आहे. प्रशासनाच्या अनास्था पाहून नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.

 नेमकं काय घडलं?

पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भाग असलेल्या म्हसरबुदुक गावातील शिंदेवस्तीतील जाईबाई शिंदे या वृद्ध महिलेला सोमवारी सकाळी 9 वाजता पॅरालिसिसचा झटका आला. घरात एकच आरडाओरड झाली. कुटुंबाला आणि वस्तीतील लोकांना कळाले की, आज्जीला तात्काळ दवाखान्यात नेणे गरजेचे आहे. पण, इथेच नियतीने त्यांची परीक्षा घेतली. म्हसरबुदुक गावापर्यंत जाण्याचा तीन किलोमीटरचा रस्ता हा केवळ मातीचा आणि दगडांचा नाही तर पावसाळ्यात या ठिकाणी सर्वत्र चिखल होता. त्यामुळे इथे कोणतीही रिक्षा किंवा चारचाकी गाडी येऊ शकत नाही.

मग काय, गावातील तरुण पुढे सरसावले. जाईबाई आज्जींना एका मोठ्या बांबूच्या डालात (टोपलीत) बसवण्यात आले. त्यानंतर, जीव मुठीत घेऊन, गुडघ्यापर्यंतच्या चिखलात पाय रोवत, भर पावसात डाला सांभाळत तीन किलोमीटरची पायपीट करू लागले. एक तासापेक्षा जास्त वेळ चिखल तुडवत आणि पायवाट शोधत ते कसेबसे म्हसरबुदुक गावात पोहोचले. गावातही प्राथमिक आरोग्य केंद्राची सोय नसल्याने, पुढचा प्रवास खाजगी गाडीने भोर शहरातील रुग्णालयापर्यंत झाला. रस्ता नसल्यामुळे उपचाराला झालेला हा जीवघेणा उशीर जाईबाई आज्जींच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरला.

शिंदेवस्तीची २५ घरांची व्यथा समोर

ही केवळ जाईबाई शिंदे यांची कथा नाही, तर भाटघर धरण आणि निरादेवघर परिसरातील अनेक डोंगरी गावांची हीच व्यथा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या गावांना मूलभूत सुविधा, विशेषतः रस्त्यासारख्या सुविधांपासून वंचित ठेवले गेले आहे. पावसाळ्यात जेव्हा रस्ते चिखलात बदलतात, तेव्हा आजारी व्यक्तीला, सर्पदंश झालेल्याला किंवा प्रसूतीकळा सोसणाऱ्या महिलेला डालातून, डोलीतून किंवा पाठीवर घेऊन जीवघेणी पायपीट करावी लागते. अनेकदा रुग्णाचा दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच जीव जातो. पण प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत आहे. म्हसरबुदुक येथील शिंदेवस्तीची २५ घरांचा संपर्क पावसाळ्यात तुटतो. दळणवळणाअभावी त्यांना कोणी आजारी पडल्यास किंवा अचानक काही झाल्यास केवळ देवाच्या भरवशावर राहावे लागते. त्यामुळे आम्ही भारताचे नागरिक आहोत की नाही? असा संतप्त सवाल इथले ग्रामस्थ विचारत आहेत.