आबांच्या पत्नीमुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचले, आमदार सुमनताई पाटलांची मदतीसाठी तत्परता

| Updated on: Sep 12, 2021 | 12:13 PM

अपघातानंतर दोघंही तरुण जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते. यावेळी माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील याच रस्त्याने जात होत्या. त्यांनी तो अपघात पाहिला आणि माणुसकी दाखवत तातडीने त्या दोन्ही जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली.

आबांच्या पत्नीमुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचले, आमदार सुमनताई पाटलांची मदतीसाठी तत्परता
सुमन पाटील यांची अपघातग्रस्तांना मदत
Follow us on

सांगली : स्वर्गीय नेते आर आर आबा पाटील (R R Patil) यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील (Suman Tai Patil) यांच्यामुळे दोन अपघातग्रस्तांचे प्राण वाचले. कोल्हापूर आणि सांगलीच्या दोघा जखमींना उपचारासाठी दाखल करत आमदार सुमनताई यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.

नेमकं काय घडलं?

सांगली जिल्ह्यातील तासगाव मणेराजुरी रस्त्यावर वासुबे फाटा येथे मोटारसायकल आणि टेम्पो यांच्यात जोरदार धडक झाली होती. या अपघातात मोटारसायकलवरील कोल्हापूर जिल्ह्यातील गुडमुडशिंग गावचा अविनाश काटकर (वय 24 वर्ष) आणि सांगली जिल्ह्यातील वसगडे गावचा शुभम शिंदे (वय 24 वर्ष) हे दोघे गंभीर जखमी झाले होते.

सुमनताईंनी रस्त्यावर अपघातग्रस्तांना पाहिले

अपघातानंतर दोघंही तरुण जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते. यावेळी माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील याच रस्त्याने जात होत्या. त्यांनी तो अपघात पाहिला आणि माणुसकी दाखवत तातडीने त्या दोन्ही जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली.

रुग्णवाहिका बोलावून त्यांना तासगाव आणि नंतर सांगली शासकीय रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. सुमनताईंच्या कार्यतत्परतेमुळेच केवळ त्या दोन्ही जखमींची प्राण वाचल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

कोण आहेत सुमनताई पाटील?

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील उर्फ आबा पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील या राष्ट्रवादीकडून सांगली जिल्ह्यातील तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने सुमन पाटील यांना तिकीट दिले होते. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आणि त्या पुन्हा आमदारपदी निवडून आल्या.

आबांच्या लेकाचीही रुग्णांसाठी धडपड

याआधी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोननंतर राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आबांचे पुत्र रोहित पाटील (Rohit Patil) मध्यरात्री ऑक्सिजन घेऊन ग्रामीण रुग्णालयात गेले होते. तासगावातील रुग्णांसाठीही त्यांनी ऑक्सिजनची सोय केली. रोहित पाटलांची रुग्ण वाचवण्यासाठी धडपड पाहून उपस्थितांचे मन हेलावले होते.

काही महिन्यांपूर्वी रात्री साडेबारा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना फोन केला होता. ‘रोहित, ऑक्सिजन टँकर पाठवला आहे. तू स्वतः थांबून तो उतरवून घे’ अजितदादांच्या फोननंतर क्षणाचाही विलंब न करता रोहित पाटील यांनी मध्यरात्री सांगलीत जाऊन ऑक्सिजन टँकर उतरवून घेतला. त्यानंतर यातील 23 जंबो टाक्या आणि 2 ड्युरा टाकी ऑक्सिजन घेऊन रोहित पाटील स्वतः ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा उपस्थित झाले होते. ऑक्सिजनभावी कोरोनाग्रस्त रुग्ण दगावू नयेत, याची काळजी घेत मध्यरात्री रुग्ण वाचवण्यासाठी आबांच्या मुलाने केलेली ही धडपड कौतुकास्पद ठरली होती.

संबंधित बातम्या :

आबांच्या मुलापाठोपाठ पत्नी-आमदार सुमन पाटीलही कोरोना पॉझिटिव्ह

रोहित, ऑक्सिजन टँकर पाठवलाय, स्वतः थांबून उतरवून घे, आबांच्या मुलाला अजितदादांचा फोन, रोहित पाटलांची मध्यरात्री धडपड