महाराष्ट्रात आभाळ फाटलं! कुठे पूरस्थिती, तर कुठे जनजीवन विस्कळीत? आज कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

maharashtra rain update : महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झाली आहे.

महाराष्ट्रात आभाळ फाटलं! कुठे पूरस्थिती, तर कुठे जनजीवन विस्कळीत? आज कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
| Updated on: Jul 31, 2026 | 11:39 AM

महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. धुव्वादार पावसाने राज्यातील विविध जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. विदर्भातही पावसाची जोरदार एन्ट्री झाली आहे. या पावसाने काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरल्याचे समोर आलं आहे. पावसाच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. विदर्भात अतिवृष्टी झाल्याने काही ठिकाणी पूल वाहून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. तर शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे? जाणून घ्या.

वर्ध्यात शेतातील पिके पाण्याखाली

वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. वर्धा ते राळेगाव मार्गावरील सरूळ शिवारात यशोदा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आला आहे. भिडी, रत्नापूर, शिरपूर येथे जवळपास १५ घरामध्ये पावसाचे पाणी शिरले होते. यशोदा नदी काठावरील शेकडो एकरातील पिके पाण्याखाली गेले आहेत. अल्लीपूर ते टाकळी मार्गावर पुरामुळे झाडावर आसरा घेतलेल्या एका युवकाचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं. सध्या पाऊस थांबला असून पुराचे पाणी ओसरू लागलं आहे.

बुलढाण्यात मुसळधार पाऊस

गेल्या 24 तासापासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस बरसत आहे. जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात सातपुड्यात बरसत असलेल्या पावसामुळे सर्व नदी आणि ओढ्यांना महापूर आलं आहे. पुराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झालेलं आहे. जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर सह इतर तालुक्यात शेकडो हेक्टर शेती ही पाण्याखाली गेली आहे. पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालं आहे.

अमरावतीत पावसाचं थैमान

अमरावीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे. खर्बी गुंड परिसरात शेतकऱ्याच्या शेतात तलावाचं स्वरूप आलं आहे. पावसामुळे अनेक विद्युत प्रवाह करणारे पोल कोसळले. आहेत. लिंबूची बाग अक्षरशः पाण्यात गेली आहे .

धुळ्यात खरीप पिके पाण्यात

धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील शेते जलमय झाली आहेत. धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खरीप पिके पाण्याखाली गेली आहे. तर शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही भागांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला असला आहे. तरी सततच्या पावसामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोयाबीन, मका, कापूस आणि इतर खरीप पिके पाण्यात बुडाल्याने नुकसानाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात मागील 24 तासांपासून पावसाची जोरदार बॅटिंग

संततधारेने बुलढाणा जिल्ह्यातील खरीप पिकांना जीवदान दिले आहे. मात्र पावसाच्या ताळेबंदातील तूट अद्याप कायम आहे. जिल्ह्यात सुमारे ९६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, पिके वाढीच्या निर्णायक टप्प्यावर आहेत. त्यामुळे सध्याचा पाऊस पोषक असला, तरी गतवर्षीच्या तुलनेत पडलेला कमी पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा आहे. जुलै अखेरीस म्हणजे मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ११.५ मिलिमीटर पाऊस झाला. तर घाट खालील जळगाव जामोद, खामगाव, शेगाव , संग्रामपूर तालुक्यात जोरदार पावसाने बॅटिंग केलीय. यामुळे या भागातील नदी नाल्यांना पूर आला आहे. या पावसामुळे जमिनीत पिकांना पुढील काही दिवस तग धरण्याइतकी ओल निर्माण झाली आहे.. तर शेगावात घरची भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सुद्धा घडलीय.

नदीकाठावरील शेतीचे नुकसान, नदीला पूर

बुलढाणा जिल्ह्यात मागील 24 तासांपासून कुठे मुसळधार तर कुठे रिमझिम पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे. या भागातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. तर नदी काठावरील शेतीचेही नुकसान झाले असून या भागातील शेतकरी पुनः अडचणीत सापडला आहे. संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील नदीला पूर आला तर येणगाव, वडशिंगी, खर्डा, माडाखेड, भेंडवड येथील नदीला सुद्धा पूर आला आहे.

नंदुरबारमध्ये पावसाची दमदार हजेरी

नंदुरबार जिल्ह्यात सलग तीन दिवसांच्या रिमझिम पावसानंतर अखेर पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. रात्रभरापासून नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू असून, शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर आणि जुलै महिन्याच्या अखेरच्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १९.८ टक्के पावसाची नोंद झाल्याने खरीप हंगामातील सुमारे ४० टक्के पेरण्या रखडल्या होत्या. अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीतीही व्यक्त केली जात होती. रात्रभर सुरू असलेल्या या दमदार पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग मिळण्याची शक्यता आहे. पावसामुळे कापूस, मिरची आणि मका या पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. काही दिवस जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कायम राहिल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नालाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

धुळ्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत

धुळ्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. धुळे जिल्हा रुग्णाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे. महापालिकेच्या वतीने योग्य साफसफाई झाली नसल्याने जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पाणी आहे. विविध शाळाच्या आवारात देखील पाणी साचले आहे.

अमरावती मुसळधार पाऊस

गेल्या 24 तासापासून अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे. अमरावती जिल्ह्यातील दिघी कोल्हे या गावात चक्क रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे दिघी कोल्हे येथील नदीला पूर आल्याने पुराचे पाणी गावात शिरले आहे. प्रशासनाने गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या मुसळधार पावसामुळे नांदगाव खंडेश्वर शहरातील दुकानासह नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. अमरावती शहरासह परिसरात विभागाच्या वतीने अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कालपासून अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे.

वाशिममध्ये अनेक झाडे पडली उन्मळून

वाशिम जिल्ह्यात रात्रभर झालेल्या जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. वाळकी, दोडकी, जुमडा या गावांसह वाशिम शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरातही एक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे शासकीय विश्रामगृह परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे ही घटना दिवसा घडली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. रिसोड मार्गावरील धोडप बुद्रुक येथील पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

नाशिकमध्ये रेड अलर्ट जारी

नाशिक जिल्ह्याला हवामान खात्याकडून पुढील तीन तासासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. नदीकाठच्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून 2498 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us