माझे दोन लेकर…; जात प्रमाणपत्र मिळेना, हवालदिल झालेल्या बापाने संपवलं जीवन, लातूरमध्ये हळहळ

महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाढती अस्वस्थता दिसून येत आहे. लातूरमध्ये महादेव कोळी समाजातील एका तरुणाने जाती प्रमाणपत्र न मिळाल्याने आत्महत्या केली. यापूर्वीही ओबीसी समाजातील तरुणाची आत्महत्या झाली होती.

माझे दोन लेकर...; जात प्रमाणपत्र मिळेना, हवालदिल झालेल्या बापाने संपवलं जीवन, लातूरमध्ये हळहळ
| Updated on: Sep 14, 2025 | 9:46 AM

सध्या महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्दा चांगलाच पेटला आहे. राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तीव्र संघर्ष सुरु आहे. त्यातच लातूर जिल्ह्यात महादेव कोळी समाजाच्या एका तरुणाने जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजी मेळ्ळे (३२) असे या तरुणाचे नाव आहे. यामुळे मराठा, ओबीसी आणि महादेव कोळी अशा तिन्ही समाजांमध्ये अस्वस्थता समोर येत आहे. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तरुण आत्महत्या करत असल्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दादगी गावात राहणाऱ्या शिवाजी वाल्मिक मेळ्ळे (३२) या तरुणाने विजेच्या करंटचा शॉक घेऊन आत्महत्या केली. गेल्या वर्षभरापासून ते आपल्या दोन मुलांसाठी महादेव कोळी जातीच्या प्रमाणपत्राची वाट पाहत होते. मात्र प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांच्या मुलांना शिक्षणासंदर्भात शिष्यवृत्ती मिळत नव्हती. तसेच इतर फायद्यांपासूनही मुलांना वंचित राहावे लागत होते. गेले वर्षभर प्रमाणपत्र न मिळाल्याने मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. याबद्दल त्यांनी एक सुसाईट नोट लिहिली आहे.

माझे दोन लेकरं शिकायला आहेत. मी मजुरी करून घर चालवत आहे. लेकराला महादेव कोळ्याचं प्रमाणपत्र मिळत नाही, हे सरकार प्रमाणपत्र देत नाही… म्हणून मी करंटला धरून जीवन संपवतोय.” असा आशयाचे पत्र शिवाजी मेळ्ळे यांनी लिहिले आहे. यानंतर त्यांनी विजेच्या करंटचा शॉक घेऊन आत्महत्या केली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. आता याप्रकरणी शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता होत आहे.

दोन दिवसांपूर्वी ओबीसी तरुणाची आत्महत्या

महाराष्ट्राच्या राजकारणात आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. यापूर्वी मराठा आरक्षणाच्या वादातून भरत कराड या तरुणाने ओबीसी आरक्षण संपेल या भीतीपोटी आत्महत्या केली होती. लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील भरत कराड हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे चिंतेत होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्यास ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात येईल अशी भीती त्यांना वाटत होती. ते फारसे शिकलेले नव्हते, त्यामुळे आपल्या मुला-मुलींच्या भविष्याची त्यांना विशेष काळजी होती.

आपल्या मुलामुलींना शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाचा लाभ मिळणार नाही या विचाराने ते निराश झाले होते. याच निराशेपोटी त्यांनी मांजरा नदीपात्रात उडी घेऊन टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. यात त्यांनी माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा, असे म्हटले आहे. यानंतर आता आणखी आरक्षणामुळे आणखी एक आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.