
संदीप जाधव, टीव्ही 9 मराठी, मुंबई : राज्यातील नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उद्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी आपल्याच गोतावळ्यातील लोकांना तिकीट मिळवून दिल्याचे पाहायला मिळत आहे. विदर्भातील दहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांमध्ये यंदा अनेक राजकीय घराण्यांचे सदस्य, विद्यमान आमदार आणि मंत्र्यांचे नातेवाईक थेट मैदानात उतरले आहेत. या समीकरणांमुळे या ठिकाणच्या निवडणुका प्रतिष्ठित बनल्या आहेत.
धामणगाव रेल्वे नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी भाजपाचे एकूण 15 सदस्य सभागृहात होते, तर काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य होता. या ठिकाणी भाजपाचे आमदार प्रताप अडसड आणि काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. धामणगाव रेल्वे नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या वतीनं वर्षा देशमुख आणि भाजपाच्या उमेदवार आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना रोठे यांच्यात लढत आहे.
अमरावतीतील दर्यापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यंदा चुरस शिगेला पोहोचली आहे. यंदा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन जावांमध्ये थेट सामना होणार आहे. भाजपाच्या आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाकळे या नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरल्या आहेत. नलिनी भारसाकळे यांच्या विरोधात त्यांच्या जाऊ मंदा भारसाकळे काँग्रेस पक्षाकडून उमेदवार आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारणातच नव्हे तर कुटुंबातील तणावही चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे दर्यापूर नगरपरिषद दोन जावांची निवडणूक पाहायला मिळणार आहे.
चिखलदरा नगर परिषदेत गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे १२ आणि भाजपाचे ५ सदस्य होते. चिखलदरा नगरपरिषद ही निवडणूक सर्वात लक्षवेधी ठरली आहे कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ आल्हाद कलोती यांनी या ठिकाणाहून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. थेट मुख्यमंत्र्यांशी नातेसंबंध असल्याने या निवडणुकीला एक वेगळे महत्त्व निर्माण झाले. ते या निवडणुकीत बिनविरोधी विजयी झाले आहेत.
चंद्रपूरच्या भद्रावती नगरपालिका निवडणुकीत भाजपने नगराध्यक्ष पदासाठी अनिल धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. अनिल धानोरकरांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजकीय खेळी करत भद्रावती भाजप शहर अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष ॲड. सुनील नामोजवार यांना काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली आहे. अनिल धानोरकर हे प्रतिभा धानोरकर यांचे दीर आहेत. ॲड. सुनील नामोजवार यांनी यामुळे भाजप शहर अध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षातून एकमेकांसमोर उभे ठाकल्याने अमरावतीतील ही लढत दोन्ही पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे.
अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेत शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांचे चिरंजीव यश लवटे यांना नगराध्यक्षपदासाठी भाजप-शिवसेना युतीने ही उमेदवारी दिली आहे. युवा नेतृत्व म्हणून ते वडिलांचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अंजनगाव सुर्जी नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून भाजपने डॉ. संजय कुटे यांना उमेदवारी दिली आहे.
भंडारा नगरपरिषद निवडणुकीत आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आमदाराच्या पाठिंब्याने त्या भंडारा शहरात पक्षाला मजबूत करण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत.
थोडक्यात, विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांची ही निवडणूक केवळ पक्षांच्या चिन्हांवर नव्हे, तर नेते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वैयक्तिक प्रभावावर, राजकीय वारशावर आणि जनसंपर्कावर लढली जात आहे. यामुळे मतदारांना एकाचवेळी अनेक राजकीय घराण्यांचे भविष्य निश्चित करण्याची संधी मिळाली आहे.