Rain Alert : पुन्हा संकट, महाराष्ट्रात बरसणार पावसाच्या सरी ? हवामान विभागाचा अलर्ट काय ?

गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे येणारी दिवाळीही ओलीच जाण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून माघार घेत असला तरी, बंगालच्या उपसागरातील स्थितीमुळे पुढील 2-3 दिवस राज्यात पावसाच्या सरी अपेक्षित आहेत, तर काही ठिकाणी उन्हाचा तडाखा कायम राहील.

Rain Alert : पुन्हा संकट, महाराष्ट्रात बरसणार पावसाच्या सरी ? हवामान विभागाचा अलर्ट काय  ?
Rain Updates
| Updated on: Oct 15, 2025 | 8:41 AM

अनेक महिन्यांपासून बरसणाऱ्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतल्याने अखेर राज्यातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. सणासुदीचा काळ समोर आहे, दिवाळी सुरू होण्यास आता 2-4 दिवसच बाकी आहेत. मात्र ही दिवाळीदेखील ओलीच जाण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्याचं कारण म्हणजे राज्यात पुढील 2-3 दिवसांत पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे गणपती, नवरात्र, दसरा यानंतर दिवाळीतही महाराष्ट्रातील नागरिकांन छत्र्या उघडूनच सण साजरा करावा लागू शकतो. हवामान विभागाने यासंदर्भात अलर्ट दिला आहे. पण उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहू शकतो, अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे

राज्यात पावसाला पोषक वातावरण

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम-मध्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच बंगालच्या उपसागरातदेखील दक्षिण बांगलादेश आणि आसपासच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्याची स्थिती कोमोरीन भागाकडे येणार असल्याने लक्षद्वीप, केरळ, दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत रविवारपर्यंत (19 ऑक्टोबर) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. याचाच परिणाम म्हणजे, राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पाऊस पडू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींची शक्यता आहे. मात्र असे असले तरीही मोसमी पाऊस पुढील काही दिवसांत माघार घेईल असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

 

नैऋत्य मोसमी पाऊस लवकरच घेणार निरोप

दरम्यान, देशातून नैऋत्य मोसमी पाऊस लवकरच निरोप घेणार आहे. सोमवारी बहुतांश महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरला असून लवकरच दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होणार आहेत. त्यामुळे आगामी दिवसांत राज्यात आकाश ढगाळ राहणे आणि तुरळक ठिकाणी सरी बरसण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात उन्हाचा तडाखा वाढला

राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असून सूर्य डोक्यावर आल्यावर दुपारी बाहेर पडणेही जिकीरीचे ठरत आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 32 अंशांपार गेला आहे. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 35.5 अंश तापमानाची नोंद झाली आहे. सांताक्रुझ, जळगाव, सोलापूर, ब्रह्मपुरी, अमरावती येथे 34 अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले.