Maharashtra Weather Update : ऐन दिवाळीत धुंवाधार पाऊस, पुढील 72 तास धोक्याचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

महाराष्ट्रात दिवाळीचा उत्साह असतानाच अचानक हवामानात बदल झाला आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील स्थितीमुळे पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

Maharashtra Weather Update : ऐन दिवाळीत धुंवाधार पाऊस, पुढील 72 तास धोक्याचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
| Updated on: Oct 24, 2025 | 8:30 AM

महाराष्ट्रात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता सणासुदीच्या दिवसात हवामानात बदल होताना दिसत आहे. पुढील तीन दिवस पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील स्थानिक हवामान स्थितीमुळे ऐन दिवाळीत अनेक ठिकाणी धुंवाधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामुळे नागरिकांनी छत्री-रेनकोट सोबत ठेवा असे आवाहन करण्यात आले आहे.

अनेक भागात ढगांची गर्दी

काही दिवसांपूर्वी वातावरणात ऑक्टोबर हीटचा जाणवत होता. तर रात्रीच्या वेळी हलका गारवा अनुभवता येत होता. मात्र गेल्या २४ तासांत अचानक झालेल्या हवामान बदलामुळे दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीच्या अनेक भागात ढगांची गर्दी दिसत आहे. तसेच अनेक शहर आणि परिसरासह राज्यातील काही भागात जोरदार सरी कोसळल्या आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे ऐन दिवाळीत सण साजरा करताना नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी २३ ते २५ ऑक्टोबर रोजी हवामानात मोठा बदल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या काळात राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यलो अलर्ट जारी झालेले जिल्हे

२३ ऑक्टोबर : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग; पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि मराठवाडा-विदर्भातील धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली.

२४ ऑक्टोबर : कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांसह आता खान्देशातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर या विदर्भातील जिल्ह्यांचाही समावेश.

२५ ऑक्टोबर : प्रामुख्याने कोकण, रायगड, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर आणि मराठवाडा, संभाजीनगर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज.

घराबाहेर पडताना रेनकोट किंवा छत्री सोबत ठेवा

ऐन काढणीच्या काळात आलेल्या या परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर पाहता नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी. तसेच आवश्यक असल्यास घराबाहेर पडताना रेनकोट किंवा छत्री सोबत ठेवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.