
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपाठोपाठ आता महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणुका पार पडत आहे. यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे डोळे लावून बसलेल्या राजकीय पक्षांसाठी आणि इच्छुकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. राज्य निवडणूक आयोग आज दुपारी ४ वाजता महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेणार आहे. यामध्ये राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिले होते. मात्र, प्रशासकीय कारणांमुळे आयोगाने १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. काल १२ जानेवारीला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ही मागणी मान्य केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने येत्या १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत या निवडणुका पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. यामुळे आयोगाकडून तातडीने आज हा कार्यक्रम जाहीर केला आहे.
या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मर्यादा असलेल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांचा समावेश असेल, अशी माहिती समोर येत आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर संबंधित जिल्ह्यांमध्ये तात्काळ आचारसंहिता (Model Code of Conduct) लागू होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्जांची विक्री, छाननी, माघार आणि प्रत्यक्ष मतदानाची तारीख कधी असणार याची माहिती आजच्या पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे.
प्रामुख्याने ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत आहे, अशा जिल्ह्यांचा यात समावेश आहे. यामध्ये पुणे, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उर्वरित २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका आरक्षणाच्या कायदेशीर कचाट्यामुळे दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जाऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आता ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या महाराष्ट्राती २९ महानगरपालिकांसाठी मतदान पार पत आहे. या मतदानानंतर लगेचच ग्रामीण भागातील निवडणुका होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे. सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ दिल्यानंतर किती टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्याचच आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. आजच्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार आहे. आज सांयकाळी ४ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.