MukhyaMantri Ladki Bahin : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, आणखी एका मंत्र्याने दिलेली नवीन अपडेट काय?

महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना तिच्या अर्थसंकल्पीय परिणामांमुळे चर्चेत आहे. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या योजनेमुळे तिजोरीवर पडणाऱ्या ताणावर भाष्य केले .

MukhyaMantri Ladki Bahin : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, आणखी एका मंत्र्याने दिलेली नवीन अपडेट काय?
ladki bahin yojana
Image Credit source: social media
| Updated on: Apr 01, 2025 | 1:05 PM

महाराष्ट्रातील महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू झाल्यापासूनच कायम चर्चेत आहे. ही लोकांना भुलवणारी योजना असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र विधानसभा निवडणुकीत ही योजना सरकारसाठी अगदी गेमचेंजर ठरली आणि महायुती सरकार मोठ्या मँडेटने पुन्हा निवडून आलं. पण त्यानंतर मात्र या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू झाली आणि निकषात न बसणाऱ्या किंवा या योजनेचा गैरवापर करणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं.

लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर भार आल्याचं वक्तव्य सरकारमधील अनेकांनी आत्तापर्यंत अनेकदा केलं आहे. ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या, मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे सरकारतर्फे वारंवार स्पष्ट केलं आहे. आता पुन्हा महायुतीमधील मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या योजनेसंदर्भात वक्तव्य करत महत्वाचे अपडेट्स दिले.  त्यामुळे ही योजना पुन्हा चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर बोजा आला आहे, मात्र शेतकरी कर्जमाफी किंवा लाडकी बहीण यातील कोणतीही योजना बंद होणार नाही असा खुलासा क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे.

काय म्हणाले दत्तात्रय भरणे ?

लाडक्या बहिणी योजनेमुळे सध्या तिजोरीवर बोजा पडत आहे. तरी शेतकरी कर्जमाफी, शेतकरी पिक विमा अथवा लाडकी बहीण यातील कोणतीही योजना बंद केली जाणार नाहीये, याबाबत होत असलेली टीका योग्य नाही, असे राज्याचे अल्पसंख्यांक व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. शेतकरी कर्जमाफी बद्दल अजित दादांनी भूमिका मांडली आहे ती सरकारची भूमिका आहे,असे ते म्हणाले.

आजची परिस्थिती अवघड पण…

आजची परिस्थिती अवघड आहे मात्र पुढे काय होईल हे सांगता येत नाही. शेतकरी आणि लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. एक रुपयात पीक विमा योजना बंद होण्याचे चर्चा सुरू आहे, मात्र असे काही होणार नाही, असेही भरणे यांनी स्पष्ट केलं. लाडक्या बहिणींनाही 2100 रुपये दिले जाणार असून तीही योजना बंद होणार नाही याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

सध्या राज्याच्या अर्थव्यवस्थेवर थोडा ताण असल्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना पुढे ढकलली असली तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं भरणे म्हणाले.

नेत्यांनी बोलताना भान ठेवावं

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून सध्या बराच वाद सुरू आहे. त्यावरही भरणे यांनी मत मांडलं. राज्यात, समाजामध्ये तणाव निर्माण होईल असे वक्तव्य कुणीही करू नये. समाजा-समाजामध्ये वाद होणं हे योग्य नाही. प्रत्येक नेत्यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे असा सल्लाही भरणे यांनी दोन्ही बाजूंच्या नेत्यांना दिला.