
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टाकलेल्या व्हिडीओ बॉम्बने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या कथित व्हिडीओत शिंदे गटाच्या आमदाराकडे नोटांचा ढीग असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दळवी यांनी थेट दानवे यांनाच आव्हान दिलं आहे. या व्हिडीओत मी जर अंशत:ही असेल तर आमदारकीचा राजीनामा देईन, असं खुलं आव्हानच दळवी यांनी दिलं आहे. तर या व्हिडीओची पोलिसांनीच शाहनिशा करावी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा हा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला. या कथित व्हिडीओत नोटांचा बंडल दिसत आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकरणावर महेंद्र दळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे यांच्यावर मी आरोप केले होतs. त्या रागातून त्यांनी हा व्हिडीओ दिला असावा. हा व्हिडीओ बड्या नेत्याने दिला आहे. मी त्या व्हिडीओतील लोकांना ओळखत नाही. माझा फोटो मॉर्फ केलेला आहे. अंबादास दानवे यांना सुपारी देण्यात आलेली आहे, असा दावा महेंद्र दळवी यांनी केला आहे.
तटकरेंनीच हे केलंय
मी सांगतोय, मी जर या व्हिडीओत अंशत: असेल तर मी राजीनामा देईल. अंबादास दानवे हे किती खरे बोलतात किवा खोटे बोलतात हे माहिती आहे. मी एकनाथ शिंदे यांना भेटणार आणि त्यांच्याकडे बड्या नेत्याची तक्रार करणार आहे. सुनील तटकरे यांनीच हे सर्व केलं असावं, असा थेट आरोपही दळवी यांनी केला आहे.
नवऱ्यासाठी बायको धावली
दरम्यान, आमदार महेंद्र दळवी यांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या मदतीला त्यांची पत्नी मानसी दळवी धावली आहे. आमदार महेंद्र दळवी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ संदर्भात आमदार दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी तो व्हिडीओ फेक असल्याचा दावा केला आहे. दानवेंनी चेहऱ्यासकट तो व्हिडीओ सिद्ध करावा, असं माझं आव्हान आहे. असे आरोप करण्यापूर्वी पुरावे सादर करा, असं आव्हानच मानसी दळवी यांनी दानवे यांना दिलं आहे.
आधी मोर्चा, नंतर गुन्हा
दानवे यांच्या निषेधासाठी आज संध्याकाळी 5 वाजता अलिबागमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आम्ही दानवेंच्या विरोधात प्रखर निदर्शने करणार आहोत आणि निषेध व्यक्त करू. तसेच मी आमदार पत्नी म्हणून या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहे, असं मानसी दळवी यांनी स्पष्ट केलं.