लातूरमध्ये कोयता दहशत, दारूच्या दुकानाजवळ प्राणघातक हल्ला, धक्कादायक प्रकार..
लातूर येथे एका तरूणावर हल्ला करण्यात आला. कोयत्याने त्याच्यावर हल्ला झाला. या प्रकरणात पोलिस अधिकचा तपास करत आहेत. मात्र, या घटनेने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

लातूर येथील साई नाका परिसरात रोहन वाईन्स अँड बिअर शॉपजवळ दिवसाढवळ्या एका तरुणावर कोयताने प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच विवेकानंद चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून हल्लेखोरांचा शोध तीव्र केला आहे. हल्ल्यामागील हेतू अद्याप उघड झालेला नाही. मात्र, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दारूच्या दुकानाजवळ हा हल्ला करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच आता हा धक्कादायक प्रकार घडला.
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थ आणि कुटुंबीयांच्या वतीने कॅनडल मार्च काढण्यात आला. हातात मेणबत्त्या आणि निषेधाचे फलक घेत नागरिकांनी कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेत हा मोर्चा काढला. चिमुकलीला न्याय मिळावा आणि या प्रकरणातील आरोपी साहिल खैरे याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, आरोपीला कठोर शासन झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात चेतन कोळी याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. चेतन कोळीच्या मोबाईलमध्ये 649 अश्लील व्हिडिओ आणि एक हजारहून अधिक फोटो आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. तपासादरम्यान तक्रारदारांची संख्या वाढत असून, आतापर्यंत त्याच्याविरोधात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. 2022 पासून अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
पोलिसांच्या तपासात आणखी काही फोटो आणि व्हिडिओ समोर येण्याची शक्यता असून, आणखी तक्रारी दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. देगलूर येथील अंध निवासी विद्यालयातील दिव्यांग मुलीचा तीन दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. मयत मुलीच्या मृत्यू प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी देगलूर येथे रात्री उशिरा कॅन्डल मार्च काढण्यात आला. अंध निवासी विद्यालयातील अल्पवयीन दिव्यांग मुलगी आजारी पडली होती. उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला होता. मुलगी आजारी पडल्यावर शाळेने कळविले नाही. त्यामुळे मुलीवर उपचार करण्यासाठी विलंब झाला असा नातेवाईकांचा आरोप आहे.