फिल्म इंडस्ट्रीसाठी मोठी बातमी! १४ एकर शासकीय जमीन चित्रीकरणासाठी खुली; चित्रपटसृष्टीला फायदा होणार

Mankhurd Government Land for Filming: मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीला मोठी भेट मिळाली आहे. मानखुर्दची १४ एकर शासकीय जमीन चित्रीकरणासाठी मंजूर करण्यात आली आहे.

फिल्म इंडस्ट्रीसाठी मोठी बातमी! १४ एकर शासकीय जमीन चित्रीकरणासाठी खुली; चित्रपटसृष्टीला फायदा होणार
| Updated on: Oct 02, 2026 | 9:11 PM

मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीला नवीन लोकेशन मिळणार आहे. मानखुर्दमधील अंदाजे १४ एकर शासकीय जमीन आता चित्रपट, मालिका आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बाह्य चित्रीकरणासाठी उपलब्ध होणार आहे. महसूल विभागाने या जागेचा चित्रीकरणासाठी वापर करण्यास मंजुरी दिली आहे. ही जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक क्षेत्राला मोठी सुविधा मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मानखुर्द परिसरातील ही शासकीय जमीन काही काळापासून वापरात नव्हती. आता या जागेचा योग्य पद्धतीने उपयोग करून बाह्य चित्रीकरणासाठी ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईत चित्रीकरणासाठी उपलब्ध असलेल्या जागांमध्ये आणखी एका ठिकाणाची भर पडणार आहे.

Loading...

चित्रपट निर्मितीसाठी मुंबई हे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. मात्र शहरातील वाढते शहरीकरण, जागेची कमतरता आणि चित्रीकरणासाठी आवश्यक असलेल्या मोठ्या मोकळ्या जागांची उपलब्धता ही निर्माते आणि दिग्दर्शकांसमोरील आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत मानखुर्दमधील १४ एकर जागा चित्रीकरणासाठी उपलब्ध झाल्याने निर्मिती क्षेत्राला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

या निर्णयाचे भाजप नेते आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी स्वागत केले आहे. चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या निर्णयासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत.

मानखुर्दमधील या जागेचा वापर केवळ चित्रपट चित्रीकरणापुरता मर्यादित न राहता विविध सांस्कृतिक निर्मितींसाठीही करता येणार आहे. त्यामुळे मुंबईतील स्थानिक निर्मिती संस्था, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, रंगकर्मी आणि इतर सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांना चित्रीकरणासाठी पर्यायी जागा उपलब्ध होणार आहे.

महसूल विभागाच्या या निर्णयामुळे सरकारी मालकीची वापरात नसलेली जमीन सांस्कृतिक क्षेत्रासाठी उपयोगात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी काळात या जागेचा प्रत्यक्ष वापर कशा पद्धतीने केला जातो आणि चित्रीकरणासाठी उपलब्धता कशी निश्चित केली जाते, याकडे चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us