
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे आपले सर्व दौरे रद्द करून अचानक पुण्याकडे रवाना झाले आहेत. आज शिर्डी येथे मनोज जरांगे पाटील यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साई दर्शननंतर जरांगे पाटील तातडीने पुण्याकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे पुण्यात असं नेमकं काय घडलं ज्यामुळे ते पुण्याकडे रवाना झाले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र याबाबत स्व:ता जरांगे पाटलांनी माहिती दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
मनोज जरांगे पाटलांनी आज शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, ‘मी साईबाबांच्या चरणी शिर्डीला दर्शनासाठी आलो आहे. इंग्रजी नवीन वर्षानिमित्त मी साईबाबांचे दर्शन घेतले. राज्यातील जनता आणि शेतकरी सुखी समाधानी राहिले पाहिजे ही प्रार्थना साईंच्या चरणी केलीय.’
मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन करावे लागेल का यावर बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, ‘मला वाटतं नाही पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येईल. विखे पाटलांनी जबाबदारी घेतली आणि समाजाने मुख्यमंत्री आणि विखे पाटलांवर विश्वास ठेवला आहे. मराठवाड्याचा जीआर निघालेला आहे आणि त्याच पद्धतीने सगळं कामकाज होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही आणि जर वेळ आली तर सरकारचं अवघड होईल. मला समाजापेक्षा मोठं कोणी नाही.’
मनोज जरांगे पाटील तातडीने पुण्याच्या दिशेने निघाले आहेत. याबाबत माहिती देताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘मी माझे सगळे दौरे रद्द करून अचानक पुण्याला निघालोय. एक ते दीड लाख MPSC विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक त्यांची चूक नसतानाही त्रास दिला जातोय. सरकारच्या चुकीमुळे एक ते दीड लाख एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार असाल तर मोठी शोकांतिका आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीसोबत आणि विखे पाटलांसोबत देखील चर्चा केलेली आहे. मी तात्काळ पुणे येथे जाऊन एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेणार आहे. या गंभीर प्रश्नावर तातडीने मार्ग काढा असं मी मुख्यमंत्री यांच्याकडे निरोप पोहोचवला आहे.’
गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांवर होणारे बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘शेतकऱ्यांवर नैसर्गिक अडचणी किंवा बिबट्या हल्ले झाले तर ही सरकारची जबाबदारी आहे. कारण राज्यातील जनतेचे पालकत्व हे सरकारने स्वीकारलेलं असतं. शेतकऱ्यांकडे कुठलीही यंत्रणा नसते यंत्रणा ही सरकारकडे असते आणि ही सरकारने उपलब्ध करून द्यायची असते. शेतकऱ्यांकडे एक महत्त्वाचं हत्यार आहे, मात्र शेतकरी त्या हत्याराचा उपयोग करत नाही. आत्महत्या करण्याची वेळ आणि किडनी विकण्याची वेळ शेतकऱ्यावर येते. जो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेल जो कर्जमुक्ती करेल त्याला मतदान करायचं हे शेतकऱ्यांनी ठरवायचं.’