
Manoj Jarange Patil : बीडमध्ये राज्यातील समस्त ओबीसींची एक महाएल्गार सभा होणार आहे. या सभेला राज्यभरातील ओबीसी समाज हजेरी लावणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी 17 ऑक्टोबर रोजी ही महासभा पार पडणार आहे. या सभेला राज्यातील अनेक महत्त्वाचे ओबीसी नेतेही हजेरी लावणार आहेत. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात ही सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, याच सभेवर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अलिबाबाच्या आहारी गेलेल्या ओबीसी नेत्यांनी आता माकडचाळे बंद केले पाहिजेत, असा थेट सल्ला जरांगे यांनी दिला आहे.
भुजबळ यांच्या नेतृत्त्वात बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण परिसरात ही महाएल्गार सभा होईल. या सभेला माजी मंत्री धनंजय मुंडे हेदेखील उपस्थित असणार आहेत. भुजबळ यांच्या नेतृत्त्वात ही सभा होणार असल्याने जरांगे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी भुजबळ यांना येवल्याचा अलिबाबा असे म्हणत हिणवले आहे. खूप चांगले असणारे नेतेसुद्धा येवल्याच्या अलिबाबाच्या आहारी गेले आहेत. त्याच्या षड्यंत्रात हे नेते गुंतलेले आहेत. या नेत्यांना येवल्याचा अलिबाबा काही बाहेर पडू देत नाही, असा हल्लाबोल जरांगे यांनी केला.
तसेच, काही नेत्यांना हाताशी धरून येवल्याच्या अलिबाबाचे काही प्रयोग सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दबाव आणणे, हैदराबादच्या जीआरच्या आडून लपून राहायचं, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जो जीआर काढला आहे, तो रद्द करायला सांगणे, अशी कामे केली जात आहे, असा आरोपही जरांगे यांनी केला. अलिबाबाने तसेच त्याच्या आहारी गेलेल्या नेत्यांनी आता माकडचाळे बंद करावेत, असा सल्लाही यावेळी जरांगे यांनी दिला.
छगन भुजबळ हे सगळ्यांचा वापर करून घेत आहेत. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ते पैसे कमवत आहेत. ओबीसी नेत्यांना हाताखाली धरून हे सगळं चालू आहे. यांनी बीड जिल्ह्याला जातीयवादाचा आखाडा बनवलेलं आहे. कुणीही उठतो आणि त्याच ठिकाणी येत आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील लोकसुद्धा तिथेच येता आहेत, अशी टीकाही जरांगे यांनी यावेळी केली.
दरम्यान, आता जरांगे यांच्या या टीकेनंतर ओबीसी समाजातील नेतेदेखील आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी ओबीसींच्या महाएल्गार सभेत नेमके काय होणार? जरांगे यांना प्रत्युत्तर दिले जाणार का?हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.