मी एक रुपया घेतल्याचे दाखवा, उद्या फाशी घेतो, नाही तर दोन बापाचा… मनोज जरांगेंचे ओपन चॅलेंज

मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात अंतरावली सराटी येथे महत्त्वाची बैठक झाली. यावेळी जरांगे यांनी ८० हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि लाठीचार्जच्या मुद्द्यावरून सरकारवर घणाघाती टीका केली.

मी एक रुपया घेतल्याचे दाखवा, उद्या फाशी घेतो, नाही तर दोन बापाचा... मनोज जरांगेंचे ओपन चॅलेंज
Manoj Jarange Patil, Prasad Lad,
| Updated on: May 22, 2026 | 11:28 AM

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरावली सराटी येथे जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या भेटीदरम्यान मनोज जरांगे यांनी विद्यार्थ्यांची अडकलेली शिष्यवृत्ती आणि आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज या मुद्द्यांवरून सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला.

८० हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली, ६०० कोटी थकले

प्रसाद लाड यांच्याशी बोलताना मनोज जरांगे यांनी शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. जरांगे म्हणाले, “राज्यातील ८० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली आहे. मी गेल्या ८ महिन्यांत विखे पाटील यांना अनेकदा फोन करून हा विषय त्यांच्या कानावर घातला. महामंडळाच्या विषयात परतावे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे तब्बल ६०० कोटी रुपये थकले आहेत. यामुळे गरीब मराठा मुलांचे सिबील स्कोअर खराब झाले आहेत. मी केवळ आरोप करायचा म्हणून खोटे आरोप करत नाही, तर पुराव्यांसह बोलत आहे.

अनेक लोकांना वाटते की मी केवळ मुख्यमंत्र्यांवर टीका करतो. पण मुख्यमंत्री ही व्यक्ती आमच्यासाठी शत्रू किंवा दुश्मन नाही. जर ते आमचे शत्रू असते, तर याच मराठा समाजाने त्यांना निवडून दिले असते का? मला तुमच्याशी हे बोलावं लागणार आहे. तुम्ही म्हणजेच मुख्यमंत्री आहेत, असं लोक थोडक्यात बोलतात, असेही मनोज जरांगे म्हणाले.

पोलीस तुमचे, मग जनता तुमची नाही का?

तुमची आई खरंच आमची आई आहे. पण ज्यादिवशी आमच्या आईला मारलं तेव्हा आम्ही त्यांच्याबद्दल का बोलू नये. त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला उचलायला पोलीस कदर करत नव्हता. त्या आईला पाणी तरी पाजावं, छातीवर पाय देऊन बंदुकीच्या दस्तेने मारलं. तुम्ही फक्त सहन करुन दाखवा. नाक तुटलं, कान तुटले. गृहमंत्री फडणवीस आहेत. ते म्हणतात की माझे पोलीस आहेस पोलिसाला मारलं, मग जनता तुमची नाही का, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.

आम्ही एकाएकी का बदललो हे पण बघा. सात वर्षाच्या पोरीच्या पायाला गोळी लागली. ती तुमची लेक नाही का, माझ्या लेकराने काय पाप केलं. आम्ही दगड मारले, शिव्या दिल्या का, आम्ही शांत उपोषणाला बसलो. मला जर धिंगाणा करायचा असेल, तर काहीही करु शकलो असतो. इतक्या गोळ्या मारत होते.  आमच्यावर अन्याय का होतो? असेही त्यांनी विचारले.

मी उद्या सकाळी फाशी घेतो

आम्ही मुख्यमंत्र्‍याला, उपमुख्यमंत्र्‍याला काय वाईट बोललो का, मग आम्हाला का मारायचं. मी पैशाने, पदाने फुटत नाही. मला कोणी दाखवून द्यावं की मी एक रुपया घेतला, मी उद्या सकाळी फाशी घेतो, नाही घेतला तर दोन बापाचा औलाद. सरकारने फक्त एकदा सांगावं की याला १ रुपया दिला, ७०० रुपयाचं काम दिलंय, हे कोणीही सांगावं, असे ओपन चॅलेंज मनोज जरांगे पाटील यांनी दिले.

Follow Us