
Manoj Jarange Patil Protest : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यभरातील मराठा समाजाच्या बांधवांना घेऊन ते येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहेत. त्यांच्या या मोर्चात हजारो मराठा आंदोलक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच काळात मुंबईत गणेशोत्स्वाची धूम असणार आहे. त्यामुळे नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. असे असतानाच आता मनोज जरांगे मुंबईत नेमके कसे येणार? त्यांच्या मुंबईकडचे मार्गक्रमण नेमके कसे असेल? याची सविस्तर माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे यांचा मोर्चा 27 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून निघेल. त्यानंतर तो 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे रात्री पोहोचेल. मधल्या या दोन दिवसांत त्यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक सहभागी होण्याची शक्यता आहे.
27 ऑगस्ट रोजी जरांगे सकाळी अंतरवाली सराटीहून निघणार- त्यानंतर शहागड फाटा-साष्ट पिंपळगाव-आपेगाव- पैठण कमान मार्गे-घोटण- शेवगाव- मिरी नका मार्गे- पांढरी पुल मार्गे- अहिल्यानगर बायपास मार्ग- नेप्ती चौक मार्गे- आळाफाटा मार्गे- शिवनेरी किल्ला असा त्यांचा मार्ग असेल. नंतर ते जुन्नर येथे मुक्काम करतील. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी ते शिवनेरी किल्ल्यावर दर्शन घेऊन राजगुरुनगर खेड मार्गे- चाकण मार्गे- तळेगाव मार्गे- लोणावळा मार्गे- पनवेल मार्गे- वाशिम मार्गे- चेंबूर मार्गे मुंबईच्या आझाद मैदावर पोहोचतील.
येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात सखल मराठा बांधवाकडून जोरदार तयारी सुरू आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील चलो मुंबई अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. जिल्ह्यात गावोगावी मराठा बांधवांकडून चावडी बैठकातून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईला आले पाहिजे असं आवाहन या बैठकीतून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील 27 ऑगस्टला मुंबई जाण्यावर ठाम आहेत, 26 तारखेपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या मागण्याचा विचार करावा असे त्यांनी म्हटले आहे.