
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांना आज आंतरवाली सराटीतून गावकरी आणि कुटूंबीयांनी निरोप दिला. ते मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार आहेत.

आज आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांना निरोप देताना मोठ्या प्रमाणात गावकरी आणि नातेवाईक उपस्थित होते. यावेळी त्यांना ओवाळण्यात आले आणि विजयी होऊन परतण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

मनोज जरांगे पाटील यांची पत्नी आणि मुलगीही यावेळी उपस्थित होती. या दोघींच्याही डोळ्यात पाणी आले होते. या दोघींनीही जरांगे पाटलांना मिठी मारली, यावेळी जरांगे पाटीलही भावूक झाले होते.

मनोज जरांगे पाटील यांचा आंतरवाली सराटीतून निघतानाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यात जरांगे पाटलांना निरोप देण्यासाठी लोकांची गर्दी झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटलांसोबत राज्यभरातील हजारो मराठा बांधव आहेत. जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर 29 ऑगस्टपासून उपोषणाला बसणार आहेत.