
आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गड येथे दसरा मेळावा पार पडला, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बरी नसताना देखील त्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित आहेत. दरम्यान या मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी केलेल्या एका विधानामुळे सर्व उपस्थित असलेले लोक चांगलेच भावुक झाल्याचे पहायला मिळाले. ‘शररीरात ताकद नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, आठवत असली तर बघा, एक पाच सहा महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. प्रत्येकाला सांगितलं होतं, मी थोड्याच दिवसाचा पाव्हणा आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
आज खासदारांपासून आमदारांपर्यंत सर्वच जणांनी या पवित्र नारायण गडाच्या कुशीत येऊन मोठेपण सिद्ध केलं. मला बोलताना खूप त्रास होत आहे. आपला गड नगद आहे म्हणून मला ताकद मिळतेय. मला ताकद मिळाली तशी शेतकऱ्यांना मिळावी. खूप वेदना आहेत, शररीरात ताकद नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, आठवत असली तर बघा. एक पाच सहा महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. प्रत्येकाला सांगितलं होतं. मी थोड्या दिवसाचा पाव्हणा आहे, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आपण मुंबईला जायची हाक दिली, तेव्हा मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती. शेवटी शरीर आहे. काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराच्या आयुष्याचं कल्याण करू द्या. मुंबईला चला, कारण मी त्याचवेळी ही गोष्ट सांगितली होती. मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकरांना आरक्षण दिलेलं पाहायचं आहे. मागे कोणी हटू नका. कुणी मागे सरकू नका. अशी संधी पुन्हा सोडू नका. तुम्ही आता साथ दिली, त्यामुळे माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण करू शकतो, तुम्ही साथ दिली आपण जीआर घेऊन लढाई जिंकली. आता मला चिंता नाही. मी थोड्या दिवसाचा पाव्हणा असो की लय दिवसाचा. मला चिंता राहिली नाही, असं जरांगे यांनी यावेळी म्हटलं आहे.