Manoj Jarange Patil : प्रकृती खालावली, कलेक्टर आशिमा मित्तल यांना भावूक झालेले जरांगे बोलले, तुमचा अपमान करत नाहीये पण यापुढे तुम्ही..

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. पोटात अन्न, पाण्याचा थेंब नसल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. जरांगेंची प्रकृती अजून खराब झाल्याचं समजल्यानंतर मध्यरात्री अंतरवली सराटीत काय घडलं? ते जाणून घ्या.

Manoj Jarange Patil : प्रकृती खालावली, कलेक्टर आशिमा मित्तल यांना भावूक झालेले जरांगे बोलले, तुमचा अपमान करत नाहीये पण यापुढे तुम्ही..
Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 02, 2026 | 7:27 AM

कुणबी म्हणून नोंद असलेल्या मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळावं तसचं मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती अधिक खालावली असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली. मध्यरात्री जिल्हा शल्य चिकित्सकांनी स्वतः त्यांची तपासणी केली. उपचार देण्यासाठी वैद्यकीय पथकाचे प्रयत्न सुरु होते. पण जरांगे पाटलांनी उपचार घेण्यास नकार दिला. मनोज जरांगेंची प्रकृती खालवल्याच समजल्यानंतर मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीमध्ये मोठी गर्दी केली. रात्री बारा वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या तर पहाटेपर्यंत मराठा बांधवांची उपोषणस्थळी गर्दी जमलेली. जरांगे पाटलांच्या मागण्यांसोबतच त्यांना उपचार देण्याचे सरकार आणि प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे.

जालन्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी केली. प्रकृती खालावल्याने उपचार देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांसह गॅलेक्सी रुग्णालयातील डॉक्टरांचे प्रयत्न सुरु होते. उपचार घेण्यास नकार दिल्याने बराच वेळ थांबून डॉक्टर परत गेले. रात्री 12 वाजेपर्यंत अंतरवालीतील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जरांगे पाटील उपचार घेत नसल्याने मराठा बांधवांमध्ये काळजी आहे.

जरांगे पाटील भावूक

अंतरवाली सराटीत मोठ्या संख्येने मराठा बांधव दाखल होत आहेत. पिक अप ट्रॅक्टरसह चार चाकी वाहनांच्या माध्यमातून मराठा बांधव मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. वाहनांची मोठी कोंडी झाल्याने अर्धा किलोमीटर बाहेरच नवीन पार्किंग करण्यात आली असून काही वेळासाठी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. सरकारच्या शिष्ठमंडळासोबत चर्चा केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये जालन्याचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा समावेश होता. यावेळी त्यांच्याशी बोलताना जरांगे पाटील भावूक झाले.

ते तुमच्या आवाक्यातले नाही

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल जरांगे पाटलांशी बोलताना म्हणाल्या की, “आम्हाला आपली खूप काळजी आहे म्हणून इथे आलो आहोत. जे शिबिर लावतात, त्यात जास्तीत जास्त प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करत आहोत. शक्य आहे ते आपण करत आहोत. सरकार सराकात्मक आहे”. त्याचं ऐकून घेतल्यानंतर जरांगे पाटील बोलले की, “तुम्ही आलात तुमचा सन्मान आहे. तुमचा वेळ वाया घालवू नका. सरकार जाणून बुजून वेळ वाया घालवत आहे. ते तुमच्या आवाक्यातले नाही. यानंतर तुम्ही येऊ नका, तुमच्या स्तरावरच्या गोष्टी नाहीत. तुमची फरपट करून घेऊ नका”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us