मुख्यमंत्री सकारात्मक, आम्ही जे केलं ते…; जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये; 4 बडे नेते तडकाफडकी रवाना

मनोज जरांगे पाटील यांच्या ३० मे पासूनच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्री विखे पाटील आणि उदय सामंत अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

मुख्यमंत्री सकारात्मक, आम्ही जे केलं ते...; जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये; 4 बडे नेते तडकाफडकी रवाना
| Updated on: May 29, 2026 | 7:38 AM

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी भर उन्हात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर आता राज्य सरकार पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी आज दुपारी सरकारच्या वतीने एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. या महत्त्वाच्या चर्चेतून काही सकारात्मक मार्ग निघणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

‘३० तारखेपासून पुन्हा उन्हात बसणार’; जरांगे पाटलांचा थेट इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी काल (२८ मे) अंतरवाली सराटी येथे एक जाहीर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी सरकारला थेट इशारा देत येत्या ३० तारखेपासून पुन्हा एकदा उन्हात बसून आमरण उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने समाज आक्रमक झाला असून, आता मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. मनोज जरांगे यांच्या या पवित्र्यामुळे सरकारची धावपळ उडाली आहे.

चर्चेसाठी सरकारचे हायव्होल्टेज शिष्टमंडळ मैदानात

आता हे उपोषण सुरू होण्यापूर्वीच चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी तातडीने राज्य सरकारचे एक मंत्र्यांचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत रवाना झाले आहे. आज दुपारी महसूल मंत्री व मराठा उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, भाजप आमदार प्रसाद लाड, आमदार बच्चू कडू हे मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत. या भेटीत काही सकारात्मक तोडगा निघणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“मुख्यमंत्री सकारात्मक, समाजाला अपेक्षित उत्तर मिळणार”

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाण्यापूर्वी शिष्टमंडळातील नेत्यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून ते अत्यंत सकारात्मक आहेत. गेल्या २-३ दिवसांत शासनाने कायदेशीर पातळीवर काय पावले उचलली आहेत, याची सविस्तर कल्पना आम्ही जरांगे पाटलांना देणार आहोत, असे विखे पाटील म्हणाले.

तर, मराठा समाजाला न्याय मिळवून देणारे आणि सर्वांना अपेक्षित असणारे सकारात्मक उत्तर आजच्या चर्चेतून नक्कीच मिळेल, असा विश्वास आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख ५ मागण्या

  • कुणबी प्रमाणपत्र: मराठवाड्यातील सर्वच्या सर्व मराठा समाजाला ‘कुणबी’ जातीचे प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे.
  • ऐतिहासिक जीआरचा आधार: सातारा, कोल्हापूर आणि औंध या संस्थानांच्या काळातील जुने जीआर (शासकीय निर्णय) शोधून, त्या आधारावर मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्रांचे वाटप करण्यात यावे.
  • जात पडताळणी प्रमाणपत्र: ज्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रे मिळाली आहेत, त्यांना तातडीने ‘जात पडताळणी प्रमाणपत्र’ (Validity Certificate) देखील देण्यात यावे.
  • समिती बरखास्ती: सध्या कार्यरत असलेली विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील ‘मराठा उपसमिती’ तात्काळ बरखास्त करण्यात यावी.
  • स्वतंत्र मंत्रालय: मराठा आणि कुणबी समाजाच्या प्रश्नांसाठी एक स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे.

दरम्यान येत्या ३० तारखेच्या उपोषणाला अवघे २४ तास उरले आहेत. असे असताना आज दुपारी अंतरवाली सराटीत होणारी ही चर्चा मराठा आरक्षणाच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवणारी असणार आहे.

Follow Us