वर्षावर जाण्याआधी अमित शाह- एकनाथ शिंदेंची बैठक, बंद दाराआड तासभर खलबतं, चर्चेचे मुद्दे काय?

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मुंबईत मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. लाखो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली.

वर्षावर जाण्याआधी अमित शाह- एकनाथ शिंदेंची बैठक, बंद दाराआड तासभर खलबतं, चर्चेचे मुद्दे काय?
एकनाथ शिंदे, अमित शाह
| Updated on: Aug 30, 2025 | 1:04 PM

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे. आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असून त्यांच्यासोबत लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. आज मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर रस्त्यावर उतरुन जोरदार आंदोलन केले. यामुळे मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागले. यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले. एकीकडे मराठा समाज मुंबईत आक्रमक झालेला असताना दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राजकीय घडामोडींसोबतच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही चर्चा केली.

अमित शाहांनी घेतली मराठा आंदोलनाची माहिती

अमित शाह यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत तातडीने बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान राज्यातील आंदोलनाची सद्यस्थिती, पोलिसांचा बंदोबस्त आणि आंदोलकांच्या मागण्यावर यावर चर्चा झाली. त्यासोबतच अमित शाह यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. साधारण तासभर सुरु असलेल्या या बैठकीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विविध पर्याय काय यावर विचारमंथन करण्यात आले. सरकार आणि आंदोलक यांच्यातील संवाद आणि पुढे काय करायचे, याबद्दल अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात बोलणं झाल्याची माहिती मिळत आहे.

अमित शाह दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानावरील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अमित शाहांच्या हस्ते वर्षावरील बाप्पााचीही आरतीही करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शाह, एकनाथ शिंदे यांच्यासह काही नेतेमंडळीही उपस्थित होते. आता यानंतर अमित शाह हे लालबागचा राजा या मंडळाला भेट देणार आहेत. त्यासोबच अमित शाह मुंबईतील इतर गणपतींचेही दर्शन घेणार आहेत.

मनोज जरांगेंच्या मागण्या काय?

दरम्यान मराठा आरक्षणासाठी मुंबईत उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनासाठी काही प्रमुख मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत. मराठा समाजातील सर्व लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळायला हवे. मराठा आणि कुणबी एकच आहेत, हे शासनाने स्वीकारून तशी कायदेशीर अंमलबजावणी करावी. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी हैदराबाद आणि बॉम्बे गॅझेटियरचा आधार घ्यावा, अशी मागणी जरांगेंनी केली आहे. ज्या व्यक्तीकडे कुणबी असल्याचा पुरावा आहे, त्याच्या नातेवाईकांना (सगेसोयरे) देखील कुणबी प्रमाणपत्र द्यावे. यासाठी ‘सगेसोयरे’ या शब्दाची कायदेशीर व्याख्या करून त्याला पोटजातीचा दर्जा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

तसेच आरक्षणासाठी यापूर्वी झालेल्या आंदोलनांमध्ये मराठा कार्यकर्त्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे सरकारने तात्काळ आणि बिनशर्त मागे घ्यावेत, अशी त्यांची चौथी मागणी आहे. त्यासोबतच कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण द्या, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली