
मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर काढण्यात आला. यानंतर मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण असेल तरी ओबीसी नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. त्यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर छगन भुजबळ अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. आता माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर यावरुन जोरदार टीका केली आहे.
शहाजी बापू यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. “छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी समजून घ्यायला हवं. छगन भुजबळ यांनी केवळ मतांसाठी समाजाला भडकवण्याचं काम करू नये. प्रसिद्धी व निवडणूक यापलीकडे त्यांच्या डोक्यात काहीच नाही”, अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली.
यावेळी शहाजी बापू पाटील यांनी हैदराबाद आणि सातारा गॅझेटचा संदर्भ देत भाष्य केले. निजामशाही संपवून जेव्हा हैद्राबाद भारतात सामील झाले, तेव्हापासूनच त्यांनाही भारतीय संविधान लागू झाले आहे. त्यामुळे संविधानासोबतच हैदराबाद आणि सातारा येथील दोन्ही गॅझेट विचारात घेणे आवश्यक आहे. हैदराबाद आणि सातारा येथील छत्रपतींचे दोन्ही दफ्तरे तुम्हाला डावलता येणारच नाहीत, असेही शहाजी बापू पाटील यांनी म्हटले.
यावेळी शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. संजय राऊत खरं कधी बोलतात, हे सांगा. ज्या दिवशी ते खरं बोलतील, त्या दिवशी मी महात्मा गांधींच्या फोटोची पूजा करेन, असा टोला त्यांनी लगावला. संजय राऊत हे काड्या लावणारे आणि लबाड आहेत. ते दोन गटांमध्ये भांडणे लावतात. त्यांनी पेटवलेल्या राजकारणावर लवकरच एक पुस्तक लिहिणार असल्याचंही शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं. संजय राऊत यांना महायुतीमध्ये भांडण लागावं आणि महायुती फुटावी असं वाटत आहे. मात्र, ही महायुती पुढील पंचवीस वर्षे टिकणार असल्याचा विश्वासही शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला.