मराठा आरक्षणाबद्दलच्या त्या निर्णयाचे श्रेय दोन व्यक्तींचे, एक मुख्यमंत्री अन् दुसरं… विखे पाटलांनी थेट नावच सांगितलं
मनोज जरांगे पाटील यांच्या पाच दिवसांच्या उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. या विजयानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसी आरक्षणावरही स्पष्टीकरण देत त्यांनी काही मराठा नेत्यांवर टीका केली आणि मुंबईकरांची माफी मागण्यात आली.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारत मुंबईत मोठे आंदोलन केले. सलग ५ दिवस चाललेल्या या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विजय झाला. मनोज जरांगे यांच्यापुढे सरकारने शरणागती पत्कारत काल सरकारकडून एक जीआर काढण्यात आला. यात राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद गॅझेटचा जीआर हाती पडताच मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतले. मराठा आरक्षणाचा हा तिढा यशस्वीपणे सोडवल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रथमच आपल्या शिर्डी मतदारसंघात दाखल झाले. यावेळी शिर्डी विमानतळावर मराठा संघटना आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि काही राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले.
मंत्री विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे श्रेय मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटील यांना दिले. साईबाबांच्या आशीर्वादामुळे मला ही मोठी जबाबदारी पार पाडता आली. मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा बांधवांचे अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण झाले. मनोज जरांगे पाटलांनी अतिशय निस्वार्थपणे हे आंदोलन चालवले. समाजाला न्याय मिळावा, पण इतर समाजावर अन्याय करून नाही, हीच जरांगे पाटलांची भूमिका होती आणि तीच भूमिका मुख्यमंत्र्यांनीही ठेवली होती,” असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांची माफी मागितली
या निर्णयाचे संपूर्ण श्रेय दोन व्यक्तींना जाते. यातील एक व्यक्ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे मनोज जरांगे पाटील. या आंदोलन काळात दाखल झालेले गंभीर गुन्हे वगळता इतर सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच मुंबईतील आंदोलनामुळे झालेल्या असुविधांबद्दल मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांची माफी मागितली आहे. मुंबईतील प्रशासनाने मराठा बांधवांना उत्तम सहकार्य केले. मराठी माणसांमुळे मुंबई काही काळासाठी थांबली असेल तर त्यात काहीच गैर नाही,” असे विखे पाटील म्हणाले.
ओबीसींवर कोणताही अन्याय झालेला नाही
ओबीसी आरक्षणाबद्दल बोलताना विखे पाटलांनी बबनराव तायवाडे यांचे अभिनंदन केले. तायवाडे यांनी मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली, ज्यामुळे गैरसमज दूर झाले. यावेळी विखे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजीवरही भाष्य केले. “आपण ज्येष्ठ नेते आहात. ओबीसींवर कोणताही अन्याय झालेला नाही, हे आपण समजून घ्यावे.” असे विखे पाटील म्हणाले.
यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही मराठा नेत्यांवर टीका केली. “तुम्ही शंका का घेता? आंदोलनात येऊन भूमिका मांडा, बंद खोलीत का बोलता? पाच दिवसांच्या उपसमितीच्या बैठकांमध्ये कोणीही संपर्क साधला नाही. निर्णय झाल्यावर बोलणे म्हणजे मराठा बांधवांचा अपमान आहे, असे विखे पाटील यांनी म्हटले.
