बीड जिल्हा दौऱ्यात जयंत पाटलांकडून शेतीच्या नुकसानाची पाहणी, मदतीचंही आश्वासन

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने पक्षाचा विभागीय आढवा घेण्यासाठी जयंत पाटील सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. काल संध्याकाळपासून या भागात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे पक्षाची बैठक थोड्या उशिरा आयोजित करत जयंत पाटील यांनी या पूरग्रस्त भागांची पाहणी केली.

बीड जिल्हा दौऱ्यात जयंत पाटलांकडून शेतीच्या नुकसानाची पाहणी, मदतीचंही आश्वासन
जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 5:06 PM

बीड : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडतोय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज सकाळी बीड येथे नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने पक्षाचा विभागीय आढवा घेण्यासाठी जयंत पाटील सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. काल संध्याकाळपासून या भागात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे पक्षाची बैठक थोड्या उशिरा आयोजित करत जयंत पाटील यांनी या पूरग्रस्त भागांची पाहणी केली. (Jayant Patil and Dhananjay Munde inspect the damage of agriculture)

मराठवाड्यात अनेक ठिकाणी पुराचे पाणी, नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी आम्ही करत आहोत. मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. जायकवाडी धरणावर देखील आमचे लक्ष आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात तसेच जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात किती पाऊस झाला याची माहिती घेऊन पुढे काय परिस्थिती उद्भवेल याचा अंदाज घेतला जातोय. तसंच प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत. जलसंपदा विभाग कालपासून सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. नुकसान कमीत कमी व्हावे हा आमचा प्रयत्न आहे. मांजरा धरणाची देखील दारे उघडण्याची स्थिती उद्भवली आहे. नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे असेही जयंत पाटील यांनी आश्वासित केले.

पालकमंत्री धनंजय मुंडेंचे प्रशासनाला निर्देश

दरम्यान, सातत्याने होत असलेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात खूप मोठे नुकसान झाले आहे. काल रात्री बीड जिल्ह्यातील विविध नद्यांना व विशेषतः अंबाजोगाई तालुक्यात मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, रस्ते-पूल तुटले, वाहून गेले अशा अनेक बातम्या येत आहेत. अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला असून पुराच्या ठिकाणी रात्रीत लोक अडकले होते. एन डी आर एफ व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे. बऱ्याच प्रमाणात पशु हानी देखील झाल्याचे वृत्त आहे; याबाबत जिल्हाधिकऱ्यांशी चर्चा करून आवश्यक निर्देश दिले आहेत. त्यांच्याकडून अधिकृत आकडेवारी मिळेलच, असे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

सततच्या पावसाने बाधित क्षेत्राची आकडेवारी बदलत आहे, त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर पंचनामे अंतिम करून नुकसान झालेल्या शेतीला सरसकट मदत देण्यासंबंधीची प्रक्रिया राबविली जाईल. पूर परिस्थितीत मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास कार्यरत वॉर रूम सुरू करण्याचेही निर्देश दिले आहेत; असेही पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.

नागरिकांना धोकादायक ठिकाणी न जाण्याचं आवाहन

दरम्यान, रात्रीतून जिल्ह्यातील विविध तलावांचे दरवाजने उघडले, अनेक नद्यांना पूर येत आहेत. पुराचे पाणी रस्त्यावर असताना त्यातून वाहने घालण्याचे किंवा चालत जाण्याचे धाडस करणे टाळावे, पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या गावांनी नजीकच्या शासकीय यंत्रणांना याबाबत माहिती द्यावी. वाहत्या नद्या, जलाशय, धोकादायक बांधकामे अशा ठिकाणी जाणे पूर्णपणे टाळावे असे आवाहनही पालकमंत्री मुंडे यांनी केले आहे.

इतर बातम्या :

Marathwada Heavy Rain : मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यात अतिवृष्टी; पिकांसह शेती खरवडून गेल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट

‘जयंत पाटील आले, पण एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत’, शेती नुकसानाच्या पाहणीवेळी पंकजा मुंडेंची टीका

Jayant Patil and Dhananjay Munde inspect the damage of agriculture