
राज्यातील महापालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सर्वत्र महापौर आणि उपमहापौर पदासाठीची चुरस रंगणार आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीनंतर आजचा राजकीय पटलावरचा अत्यंत महत्त्वाचा दिवस उजाडला आहे. जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि नाशिक या ८ महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ११ वाजल्यापासून विशेष सर्वसाधारण सभांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक शहरांत कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात महापौरपसाठी ‘ठाकरे’ विरुद्ध ‘ठाकरे’ असा सामना रंगताना दिसत आहे. त्यामुळे ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपने कुणबी कार्ड खेळत निता ठाकरे यांना रिंगणात उतरवले आहे, तर काँग्रेसने स्नेहल ठाकरे यांच्या माध्यमातून तगडे आव्हान दिले आहे. भाजपचे संख्याबळ ८४ असले तरी काँग्रेस ४१ जागा आहेत. त्यामुळे काही अनपेक्षित खेळी होते का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर बिनविरोध, उपमहापौरपदासाठी अंतर्गत पेच
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असून महापौरपदासाठी रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. मात्र, उपमहापौरपदासाठी महायुतीतच बिघाडी पाहायला मिळत आहे. भाजपच्या शर्मिला बाबर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केल्याने येथे मतदान रंगणार आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपच्या हिमगौरी आडके यांच्यासमोर शिवसेना (ठाकरे गट) च्या सीमा पवार यांनी आव्हान उभे केले आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अपक्षांची भूमिका कळीची ठरेल. तर सोलापुरात मित्रपक्षांमध्येच सामना पाहायला मिळत आहे. महापौरपदासाठी भाजपचे विनायक कोंडीयाल आणि शिवसेना (शिंदे गट) चे प्रियदर्शन साठे आमनेसामने आहेत.
अमरावतीत महापौरपदासाठी भाजपचे श्रीचंद तेजवाणी आणि काँग्रेसचे संजय शिरभाते यांच्यात थेट लढत आहे. उपमहापौरपदासाठी मात्र युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे, काँग्रेसच्या लुबना तनवीर आणि बसपाचे सचिन वैद्य यांच्यात त्रिकोणी संघर्ष पाहायला मिळत आहे.
जळगाव: महायुतीच्या सूत्रानुसार दिपमाला काळे (भाजप-महापौर) आणि मनोज चौधरी (शिवसेना-उपमहापौर) यांची निवड निश्चित मानली जात आहे.
धुळे: भाजपने पूर्ण वर्चस्व राखले असून मायदेवी परदेशी (महापौर) आणि ज्योत्सना पाटील (उपमहापौर) यांची निवड केवळ औपचारिकता आहे.
कोल्हापुरात येथे रुपाराणी निकम (महापौर) आणि दुर्वास कदम (उपमहापौर) आज पदभार स्वीकारतील.
| महानगरपालिका | महापौर उमेदवार (प्रमुख लढत) | उपमहापौर उमेदवार |
| नागपूर | निता ठाकरे (भाजप) vs स्नेहल ठाकरे (काँग्रेस) | लिला हातीबेड (भाजप) vs विवेक निकोसे (काँग्रेस) |
| पिंपरी-चिंचवड | रवी लांडगे (भाजप) | शर्मिला बाबर (भाजप) vs वैशाली काळभोर (राष्ट्रवादी-अजित पवार) |
| नाशिक | हिमगौरी आडके (भाजप) vs सीमा पवार (शिवसेना-ठाकरे गट) | – |
| अमरावती | श्रीचंद तेजवाणी (भाजप) vs संजय शिरभाते (काँग्रेस) | सचिन भेंडे (युवा स्वाभिमान), लुबना तनवीर (काँग्रेस), सचिन वैद्य (बसपा) |
| सोलापूर | विनायक कोंडीयाल (भाजप) vs प्रियदर्शन साठे (शिवसेना-शिंदे गट) | ज्ञानेश्वरी देवकर (भाजप) |
| जळगाव | दिपमाला काळे (भाजप) | मनोज चौधरी (शिवसेना-शिंदे गट) |
| धुळे | मायदेवी परदेशी (भाजप) | ज्योत्सना पाटील (भाजप) |
| कोल्हापूर | रुपाराणी निकम | दुर्वास कदम |