महापौरांचं मारवाडी भाषेत स्वागत, मनसेचा संताप, भर कार्यक्रमात थेट… नेमकं काय घडलं?
मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालायातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महापौर डिंपल मेहता देखील उपस्थित होत्या. त्यांच्या स्वागताच्या वेळी अचानक मारवाडी भाषेचा वापर केल्यामुळे मनसेने संताप व्यक्त केला आहे.

राज्यात अमराठी रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मराठी शिकण्याची संधी देऊनही मराठी न शिकलेल्यांवर कारवाई होणार आहे. सरकारच्या निर्णयाने अमराठी रिक्षाचालक अस्वस्थ झाले आहेत. दरम्यान, मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मारवाडी भाषेचा वापर केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गैर-मराठी भाषेच्या वापरावरून तात्काळ आक्षेप घेतला.
मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालायातर्फे नशा मुक्ती व सायबर फ्रॉड जनजागृती अभियानाचा ग्रँड फिनाले पार पडला. महापौर डिंपल मेहता कार्यक्रमाला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात सूत्रसंचालक महिलेने महापौर डिंपल मेहता यांचे स्वागत करण्यासाठी मारवाडी भाषेचा वापर केला. त्यामुळे आता मराठी भाषेवरुन सुरु असलेला वाद आणखी पेटून उठला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गैर-मराठी भाषेच्या वापरावरून तात्काळ आक्षेप घेतला. “मीरा-भाईंदर महाराष्ट्रात आहे, त्यामुळे मराठीतच बोला” असा आक्रमक पवित्रा घेत मनसे कार्यकर्त्यांनी मराठीचा आग्रह धरला आहे.
तर दुसरीकडे मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)ने अमराठी रिक्षाचालकांना थेट इशारा देणारे बॅनर कांदिवली पश्चिम भागात लावले आहेत. चारकोप विधानसभा क्षेत्रात लागलेल्या या बॅनरमुळे स्थानिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.
काय आहे बॅनर?
बॅनरवर मनसेने स्पष्टपणे लिहिले आहे –
“अमराठी रिक्षा चालकांना विनंती आहे,
मराठी शिकण्यात व बोलण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा…!!
मात्र संप आणि आंदोलन करून मुंबईकरांना वेठीस धरलं तर मनसे गप्प बसणार नाही..!!
ही शेवटची नम्र विनंती..!!
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
चारकोप विधानसभा”
मनसेच्या या बॅनरमधून पक्षाने अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्याची आणि बोलण्याची सूचना दिली आहे. त्याचबरोबर, संप किंवा आंदोलनाच्या माध्यमातून मुंबईकरांना त्रास देण्याच्या कृतीला विरोध करण्याचेही स्पष्ट संकेत दिले आहेत. पक्षाने याला “शेवटची नम्र विनंती” असे संबोधले आहे.
कांदिवली पश्चिम आणि चारकोप परिसरात हे बॅनर ठळकपणे दिसत आहेत. स्थानिकांमध्ये याबद्दल चर्चा सुरू झाली असून, काहींनी मनसेच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे, तर काहींनी या प्रकाराला टीकाही केली आहे. सध्या पक्षाने अधिकृतपणे याबाबत कोणतेही अतिरिक्त विधान केलेले नाही.